राऊतांच्या टार्गेटवर असलेले, 25 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेले अमोल काळे कोण आहेत?
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाआयटीत 25 हजार कोटींचा घोटाळा झाला होता. या प्रकरणातील अमोल काळे, ढवंगळे आणि इतर हे कुठे आहेत हे केंद्राला विचारू, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल म्हटलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
मुंबई: देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) मुख्यमंत्री असताना महाआयटीत 25 हजार कोटींचा घोटाळा झाला होता. या प्रकरणातील अमोल काळे, ढवंगळे आणि इतर हे कुठे आहेत हे केंद्राला विचारू, असं शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी काल म्हटलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. राऊत यांच्या आरोपामुळे अमोल काळे (amol kale) अचानक चर्चेतही आले होते. त्यातच राऊत, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काळे परदेशात पळून गेल्याची शंका व्यक्त केली होती. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते. तसेच काळेंचे देवेंद्र फडणवीसांशी कनेक्शन काय आहे असा सवालही या निमित्ताने केला जात होता. तसेच या घोटाळ्यामागे फडणवीसांचा आशीर्वाद आहे का? असेही तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, अमोल काळे यांनी स्वत: मीडियाला निवेदन देऊन सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. परंतु, तरीही अमोल काळे कोण आहेत? असा प्रश्न अनुत्तरीतच होता. त्यामुळे काळेंबाबतचा घेतलेला हा आढावा.
अमोल काळे कोण आहेत?
अमोल काळे हे 43 वर्षाचे आहेत. ते नागपूरचे रहिवासी आहेत. नागपूरच्या अभ्यंकर नगरात त्यांचे दोन टोलेजंग बंगले आहेत. ते कन्स्ट्रक्शन आणि आयटी विभागाशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं. आता त्यांच्यावरील जे आरोप झाले आहेत तेही आयटी क्षेत्राशी निगडीतच आहेत. ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. तसेच तिरुमला तिरुपती समितीवर ते विशेष निमंत्रित सदस्य आहेत.
फडणवीसांशी कनेक्शन काय?
अमोल काळे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. काळे हे फडणवीसांचे बालपणापासूनचे मित्रं आहेत. फडणवीस हे शनीचे भक्त आहेत. त्यामुळे ते नेहमी शनी देवाच्या दर्शनासाठी शनी शिंगणापूरला जात असतात. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर टाईम्स ऑफ इंडियात फडणवीसांच्या शनिभक्तीवर बातमी आली होती. त्यात अमोल काळे यांनी फडणवीसांच्या शनि भक्तीचा किस्सा सांगितला होता. फडणवीस आम्हाला नेहमी शनिशिंगणापूरला घेऊन जायचे. तासाभरात जाऊन येऊ असं सांगून ते आम्हाला न्यायचे, असं काळे यांनी म्हटलं आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये बाहेरच्या लोकांना संधी नसते. मात्र, 2019मध्ये काळे यांनी एमसीएच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवली. तीही बाळ म्हादळकर गटाकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या शिफारशीवरूनच काळे यांना उपाध्यक्षपदाचं तिकीट मिळाल्याचं सांगितलं जातं. तसेच फडणवीस यांच्या शिफारशीवरूनच काळेंना तिरुमला तिरुपती संस्थेवर विशेष आमंत्रित सदस्य म्हणून घेतल्याचीही चर्चा आहे.
राऊत काय म्हणाले होते?
महाआयटी घोटाळ्यातील लोकांना पळवून लावलं आहे. एवढा मोठा घोटाळा आहे. या लोकांना मेहूल चोक्सी, नीरव मोदी आणि विजय मल्ल्याप्रमाणे पळवून लावलं आहे. महाआयटी घोटाळ्यातील काही प्रमुख लोकांना पळवून लावल्याची माझी माहिती आहे. अमोल काळे, ढवंगळे आणि इतर हे कुठे आहेत हे केंद्राला विचारू. 25 हजार कोटींचा हा घोटाळा आहे. त्याचे मनी लॉन्ड्रिंग झालं आहे. ईडी ऐकत असेल तर मी पुन्हा सांगत आहे. आम्ही हा घोटाळा बाहेर काढणार होतो, तेव्हाच ते पळून जाण्याच्या तयारीत होते, असं संजय राऊत यांनी सांगितलं होतं. एक दूधवाला महाराष्ट्रात येतो आणि 7 हजार कोटींचा घोटाळा करतो. कोण आहेत अमोल काळे? असा सवाल राऊतांनी केला होता.
काळेंचा खुलासा काय?
याप्रकरणावर अमोल काळे यांनी खुलासा केला आहे. मी खासगी व्यावसायिक असून मुंबई क्रिकोट असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे. गेले दोन दिवस काही नेत्यांची माझ्या संदर्भातील वक्तव्य पाहण्यात आली. ही सर्व वक्तव्ये पूर्णत: दिशाभूल करणारी आणि माझी बदनामी करणारी आहेत. महाराष्ट्र शासनाचं मी कोणतंही कंत्राट घेतलेलं नाही. माझ्या खासगी व्यवसायाचे तपशील प्राप्तीकर विवरणात दिले आहेत. फक्त संभ्रम निर्माण करण्यासाठी माझी हेतू पुरस्सर बदनामी केली जात आहे. जे नेते माझी बदनामी करत आहेत, त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहे, असं अमोल काळे यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या:
मी परदेशात पळून गेलो नाही, अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार; अमोल काळेंचा इशारा
VIDEO: ईडीनेही बोलावलं होतं म्हणून राऊतांना धास्ती; सोमय्यांनी वाचून दाखवलं रश्मी ठाकरेंचं ‘ते’ पत्र
चंद्रकांतदादा सोमय्यांच्या प्रकरणात पडू नका, नाही तर तुमचेही कपडे फाटतील; राऊतांचा सल्ला