ठाकरेंची खमकी साथ सोडून शिंदेंसोबत जाणारे रवींद्र वायकर नेमके कोण आहेत?
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले आमदार रवींद्र वायकर हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. रवींद्र वायकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. त्यानंतर आज अखेर वायकरांचा शिंदे गटात प्रवेश होतोय.
मुंबई | 10 मार्च 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर हे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच प्रवेश करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे रवींद्र वायकर यांच्या मतदारसंघाचा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच दौरा केला. उद्धव ठाकरे यांनी कालच रवींद्र वायकर यांच्या शाखेला भेट दिली होती. यावेळी रवींद्र वायकर यांनी ठाकरेंचं स्वागत केलं होतं. उद्धव ठाकरेंनी यावेळी रवींद्र वायकर आणि आमदार अनिल परब यांच्यावर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे, असं वक्तव्य केलं होतं. रवींद्र वायकर यांच्याविरोधात कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरु होती. विविध संस्थांनी या प्रकरणी तपास केला होता. ईडीकडूनही वायकरांची अनेकदा चौकशी झाली होती. त्यानंतर रवींद्र वायकर शिंदे गटाच प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आज रवींद्र वायकर यांचा शिंदे गटात प्रवेश होत आहे.
रवींद्र वायकर आज संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास आपल्या निवासस्थातून बाहेर पडले. त्यानंतर ते मातोश्री क्लबला आले. तिथे वायकरांचे सर्व समर्थक एकवटले होते. आपल्या सर्व संर्थकांसह आणि आणि आजी-माजी नगरसेवकांसह आमदार रवींद्र वायकर हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याच्या दिशेला निघाले. ते शिंदेच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत.
साधा शिवसैनिक ते गृह निर्माण राज्यमंत्री, रवींद्र वायकर यांचा प्रवास
आमदार रवींद्र वायकर यांची नजिकच्या काळात नेते पदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर ठाकरे गटाकडून आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड, हिंगोली, परभणी या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी वायकर यांच्यावर दिली होती. वायकर यांनी मुंबई महापालिकेत 20 वर्षे नगरसेवक म्हणून काम पाहिलं आहे. 1992 मध्ये ते जोगेश्वरीतून पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर निवडून आले होते. तर वायकर पालिकेत महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्षही होते. त्यानंतर ते 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीनवेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून निवडून आले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेते आणि विश्वासू सहकारी म्हणून वायकर यांची ओळख आहे. त्यांची काम करण्याची प्रवृत्ती आणि अभ्यासूपणा यामुळेच ते उद्धव ठाकरे यांच्या खास जवळचे आहेत. शिवसेना भवन आणि शिवालय उभारण्याच्या कामात वायकरांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती.
2014 मध्ये युतीचं सरकार राज्यात आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात रवींद्र वायकर यांची गृहराज्य मंत्रिपदी वर्णी लावण्यात आली होती. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आघाडी सरकार आल्यानंतर वायकर यांना कॅबिनेटपदी बढती मिळेल, अशी शक्यता होती. पण, रवींद्र वायकर यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नव्हती.
अनेक वेळा वायकर हे तपास यंत्रणाच्या रडारवर आल्याने चर्चेत आले. यामध्ये कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेले आरो,प तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु असलेली चौकशी आणि ईडीकडून सुरु असलेली चौकशी यामुळे वायकर चर्चेत होते. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांची पत्नी मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता.