महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. निकालाचे कल सकाळी दहा वाजेपर्यंत महायुतीच्या बाजूने राहिले आहे. महायुतीमधील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी बहुमताचा आकडा गाठला आहे. त्याचवेळी खरी शिवसेना कोणाची? याचा कल मतदारांनी दिला आहे. उद्धव ठाकरे यापूर्वी जनतेच्या न्यायालयात शिवसेनेचा निकाल लागणार असल्याचे सांगत होते. आता विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने आपला कौल दिला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेनाला मतदारांनी पसंती दिली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ५३ जागांवर आघाडी आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने २३ जागांवर आघाडी घेतली.
२१ जून २०२२ रोजी शिवसेनेला जोरदार धक्का बसला होता. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर ४० आमदार एकत्र आले. त्यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेना कोणाची? हा वाद सुरु होता. त्यावर निवडणूक आयोगाने निर्णय दिला. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला होता. आता जनतेनेही निर्णय दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली. त्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु त्या याचिकेवर अजून निकाल आला नाही. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हे जनतेच्या न्यायालयात ठरेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानुसार आता जनतेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला पसंती दिली आहे.