मुंबईत कोण वरचढ ठरेल? कोणत्या भागात कोणत्या भाषिक मतदारांचा वरचष्मा
मुंबईतल्या 36 विधानसभांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. 36 जागांचं गणित काय आहे. कोणत्या भागात कोणत्या भाषिक मतदारांचा वरचष्मा आहे. यंदा मराठी बहुल मतदारसंघात अटीतटीच्या लढती रंगणार का. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट.
मुंबईत भाषेनुसार आमदारांचं गणित बघितल्यास 2019 ला शिवसेनेचे 14 पैकी 14 आमदार मराठी होते. भाजपात 16 पैकी 10 मराठी, 4 गुजराती, 1 उत्तर भारतीय आणि 1 तमिळ भाषिक आमदार जिंकून आले. उमेदवार आणि पक्षीय मतं सोडली तर गुजराती किंवा उत्तर भारतीय बहुल भागामध्ये शिवसेनेला भाजपसोबतच्या युतीचा फायदा झाला., तर भाजपच्या उमेदवारांना पूर्ण मराठी बहुल भागात शिवसेनेच्या संघटनेचा लाभ मिळाला. बोरिवली, दहिसर, कांदिवली पूर्व, घाटकोपर पश्चिम, अंधेरी पश्चिम इथं भाजपचे 5 मराठी आमदार जिंकून आले. या भागात भाषिक मतदारांचा क्रम बघितल्यास बोरिवलीत गुजराती नंतर मराठी, दहिसरमध्ये मराठी नंबर दोनवर गुजराती, कांदिवली पूर्वेत गुजराती-मराठी, घाटकोपर पश्चिममध्ये गुजराती-मराठी आणि अंधेरी पश्चिममध्ये मराठी-गुजराती यानंतर उत्तर भारतीय आणि मुस्लिमांची मतं निर्णायक होती.
शिवसेना वरळी, शिवडी, कलिना, चेंबूर, दिंडोशी, विक्रोळी, भांडूप, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व या मराठी मतदार निर्णायक असलेल्या विधानसभांमध्ये विजयी राहिली. भाजपचे अमराठी आमदार जिंकून आलेल्या भागांमध्ये घाटकोपर पूर्व, मुलुंड, चारकोप, मलबार हिल, गोरेगाव आणि सायन कोळीवाड्याचा समावेश आहे. इथून अनुक्रमे भाजपचे ३ गुजराती, एक उत्तर भारतीय आणि एक तमिळभाषिक आमदार जिंकून आले. त्यापैकी मुलुंडमधलं भाषिक गणित गुजराती नंतर मराठी असं आहे. चारकोपमध्ये मराठी-गुजराती….मलबार हिलमध्ये गुजराती, उत्तर भारतीय, त्यानंतर मराठी, गोरेगावात मराठी नंतर गुजराती. सायन कोळीवाड्यात दक्षिण भारतीय, मराठी त्यानंतर पंजाबी मतं निर्णायक ठरतात.
- मुंबईतल्या 36 मतदारसंघावर क्रमवारीनुसार कोणत्या भाषिक मतदारांचं प्रभूत्व?वरळी, शिवडी, कलिना, चेंबूर, दिंडोशी, विक्रोळी, भांडूप पश्चिम, अंधेरी पूर्व, मागाठणे, जोगेश्वरी पूर्व, वडाळा या 10 मतदारसंघात मराठी बहुल मतदार सर्वाधिक आहेत.
- बोरीवली, कांदिवली पूर्व, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, मुलुंड आणि मलबार हिल या 5 ठिकाणी पहिल्या स्थानी गुजराती त्यानंतर मराठी मतं महत्वाची ठरतात.
- दहिसर, कुलाबा, विलेपार्ले, अंधेरी पश्चिम, चारकोप आणि गोरेगाव या 6 ठिकाणी मराठी आणि दुसऱ्या स्थानी गुजराती मतं निर्णायक आहेत.
- कुर्ला, माहिम, धारावी, मालाड पश्चिम, वांद्रे पूर्व, वर्सोवा, वांद्रे पश्चिम इथं पहिल्या स्थानी मराठी, नंतर मुस्लिम मतदार महत्वाची आहेत.
- मुंबादेवी, अणुशक्तीनगर, मानखुर्द, आणि भायखळा या 4 ठिकाणी मुस्लिम आणि मराठी मतं निकालात महत्वाची ठरतात.
- चांदिवलीत मराठी अधिक उत्तर भारतीय., आणि सायन कोळीवाड्यात दक्षिण भारतीय अधिक मराठी मतांचं प्राबल्य आहे.