असं काय घडलं की अब्दुल सत्तार शिवीगाळ करण्याइतपत चिडले? वाचा Inside Story
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्तारांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर त्यांनी सुप्रिया सुळे यांची माफी मागावी. तसेच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येतेय. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. या सगळ्या गदारोळाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याच्या महिला आयोगाने देखील घेतली आहे. हे प्रकरण चिघळण्यामागे सत्तार यांची टीका करताना जीभ घसरली हेच कारण आहे. पण सत्तार सुप्रिया सुळेंवर इतके का चिडले? असा देखील प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय. या सगळ्या एकामागे एक घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
राज्यात साडेतीन महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीचं सरकार कोसळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजपचं सरकार स्थापन झालंय. एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेतून बंडखोरी करुन भाजपची साथ धरली.
दरम्यान, राज्यातील सत्तांतरानंतर विरोधकांकडून बंडखोर आमदारांवर 50 खोके (पैसे) घेतल्याचा आरोप केला जातोय. पैशांसाठी आमदारांनी बंडखोरी केली, असा आरोप केला जातोय.
सुप्रिया सुळे यांनी नुकतंच आपल्या भाषणात सत्ताधारी शिंदे गटावर 50 खोक्यांचा आरोपांबाबत टीका केली होती. “50 खोक्यांचा आरोप केला जातोय. पण त्यावर कोणी म्हटलंच नाही की घेतले नाहीत. एकही जण अजूनपर्यंत घेतले नाही म्हटलं नाही”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.
“मला जर कोणी म्हटलं असेल की सुप्रिया सुळे तुम्ही पक्क केलं तर मी नोटीस पाठवेन. आशिष देशमुख नोटीस तयार करा आणि पाठवा. मी कुणाचे 50 खोके घेतले नाहीत”, अशी टीका सुप्रिया यांनी केली.
“एक मंत्री असं म्हणाले की तुम्हाला 50 खोके हवेत का? तर तुम्ही घेतले असेल तरंच तुम्ही म्हणाल ना की तुम्हाला हवेत का”, असा टोला त्यांनी लगावला.
“मी आज दर्शनाला गेले आणि दुसऱ्या कुणाला विचारलं की तू दर्शनाला जाऊन आला का? तो म्हटला, तुला जायचंय का? तर चल मी सोय करतो. तोपर्यंत ठीक आहे पण तुम्हालाही पाहिजेत का 50 खोके? आज गावागावत गेलंय. याचा अर्थ लोकांपर्यंत गेलंय की, हो या लोकांनी 50 खोके घेतलेय”, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं होतं.
सुप्रिया सुळे यांच्या टीकेवरच अब्दुल सत्तार यांना आज एका पत्रकाराने प्रश्न विचारला तेव्हा त्यांची जीभ घसरली. त्यानंतर राज्यातील राजकारण प्रचंड तापलं.