“बाळासाहेब थोरात महिनाभर टीव्हीसमोर का येऊ शकले नाहीत?;” सुजय विखे पाटील यांचा सवाल
एक महिना राजकारणावर काहीचं भाष्य करत नाही. याचा अर्थ सत्यजित तांबे यांच्याबाबत जी काही प्रक्रिया घडली आहे ती त्यांच्या संमतीनं घडली आहे. हे कुठही नाकारून चालणार नाही, असा टोलाही सुजय विखे पाटील यांनी लगावला.
मुंबई : नाशिकमध्ये सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यानंतर त्यांचे मामा बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे ऑपरेशन झाले. ते विश्रांती करत होते. त्यांनी राजकारणात प्रत्येक्ष कोणताही सहभाग घेतला नाही. ते महिनाभार काहीच का बोलले नाही, यावरून आता विरोधक त्यांच्यावर टीका करू लागले आहेत. खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी असं म्हंटलं की, एक महिना बाळासाहेब थोरात राजकारणावर काहीच भाष्य करत नाहीत. याचा अर्थ जेकाही झालं ते थोरात यांच्या संमतीनं झालं. सुजय विखे पाटील यांनी त्यांची ही प्रतिक्रिया दिली आहे. सुजय विखे पाटील म्हणाले, बाळासाहेब थोरात हे एक महिना टीव्हीसमोर येऊ शकले नाही. याचा खुलासा त्यांनी करायला हवा.
एखादा व्यक्ती आजारी असताना बोलूच शकत नाही, असं नाही. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असेल तर तो सर्वांसाठी असावा. एक महिना राजकारणावर काहीचं भाष्य करत नाही. याचा अर्थ सत्यजित तांबे यांच्याबाबत जी काही प्रक्रिया घडली आहे ती त्यांच्या संमतीनं घडली आहे. हे कुठही नाकारून चालणार नाही, असा टोलाही सुजय विखे पाटील यांनी लगावला.
यातून बाळासाहेब थोरात व्यथित
यासंदर्भात राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, भूमिका कोणती घ्यावी, यातून बाळासाहेब थोरात व्यथित आहेत. काँग्रेस पक्षात त्यांचा वाद आहे. काँग्रेस पक्षात प्रत्येकाने त्यांच्या सोयीनुसार वागायचे ठरविलेले दिसते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतून हे स्पष्ट होते.
यामुळं पक्षाचा अजेंडा कोण राबविणार याबाबत पक्षाचे कार्यकर्ते हे साशंक आहेत. पराभूत मानसिकतेतून हा पक्ष चाललेला आहे. याची जबाबदारी कुणी घ्याची यातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, असं मला वाटतं, असं मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं.
नाशिक मतदारसंघाचे निकाल बोलके
पक्षात कोणाला घ्यायचं, नाही घ्यायचं याचे सर्व अधिकार हे पक्षाध्यक्षांचे असतात. या निवडणुकीचा अनुभव पाहता. कोण पक्षात यायला इच्छुक आहे, याची चर्चा करण्यापेक्षा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे निकाल बोलके आहेत.
सत्यजित तांबे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. सत्यजित तांबे यांनी भाजपमध्ये यावं. उद्या येणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपसाठी काम करावं, अशी अपेक्षा असल्याचंही विखे पाटील म्हणाले. पण, कुणाला पक्षात घ्यायचं, नाही घ्यायचं हा पक्षाच्या अध्यक्षांचा निर्णय असतो. पक्ष नेतृत्व जो निर्णय घेतील तो आपण मान्य करतो, असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हंटलं.