शिवसेनेच्या जाहिरातीत फडणवीस यांचा फोटो का नाही? एकनाथ शिंदे यांनी सांगितले कारण
Eknath Shinde And Devendra Fadanvis : शिवसेनेच्या जाहिरातीवरुन राज्यातील राजकारणात चर्चा सुरु झाली आहे. देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यात देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो नाही. त्यावर एकनाथ शिंदे बोलले.
मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले. त्यावेळी मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले जात होते. मात्र, अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली. आता राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात एक सर्वे झाला आहे. त्या सर्वेची जाहिरात शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. आतापर्यंत देशात नरेंद्र-महाराष्ट्रात देवेंद्र अशा आशयाचे जाहिराती दिसत होत्या. मात्र आता देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यात फक्त एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले.
काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्र आणि राज्य सरकार हे डबल इंजिन सरकार झाले आहे. त्याचा फायदा विकास कामांना होत आहे. त्याला राज्यातील जनतेने पसंती दिली आहे. त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. आता आम्ही आणखी जोमाने काम करु. आमचा कामाचा वेग वाढेल. आम्ही पाठवलेले प्रस्ताव नरेंद्र मोदी अन् अमित शाहा जसेच्या तसे मान्य करतात. त्यामुळे राज्याला भरघोस निधी मिळत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
जाहिरातीत फडणवीस का नाही?
शिवसेनेच्या जाहिरातीत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, लोकांनी आमचे मनापासून अभिनंदन केले आहे. फोटो असेल नसेल, त्यापेक्षा आम्ही दोन्ही लोकांच्या मनात आहोत, हे महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
शिवसेना-भाजप युती ही वैचारीक युती आहे. ही स्वार्थासाठी झाली नाही. ही बाळासाहेबांच्या विचारांची युती आहे. ही युती भक्कम आहे. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने युती लढू, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ
कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात १० हजारांची वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. शेतकऱ्यांना आपलं सरकार भरघोस मदत करणार आहे. नुकसानग्रसत शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. लातूरमध्ये पशुरोग निदान प्रयोगशाळा उभारणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
काय आहे जाहिरात
राष्ट्रामध्ये मोदी
महाराष्ट्रात शिंदे
अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे, असा दावा करणारी जाहिरात करण्यात आली आहे.