Atul Bhatkhalkar on Nawab Malik: दाऊदचा माणूस तरीही मंत्रिमंडळात, भातखळकरांनी सांगितली दोन कारणं
Atul Bhatkhalkar: नवाब हा दाऊदचा माणूस आहे. तरीही तो मंत्रिमंडळात आहे. याची दोन महत्वाची कारण म्हणजे पवार आणि ठाकरे... असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांचे दाऊदशी संबंध असल्याचं आणि मनी लाँडरिंगप्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचं कोर्टाने निरीक्षण नोंदवलं आहे. त्यानंतर भाजपकडून आघाडी सरकारवर जोरदार टीका सुरू झाली आहे. नवाब मलिक हेच दाऊद आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी आता त्यावर बोललं पाहिजे. शरद पवार यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं पाहिजे. दाऊदचा माणूस असल्याचं सिद्ध झाल्यानंतरही मलिकांना मंत्रिमंडळात का ठेवलं? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला घेरलं आहे. दाऊदचा माणूस तरीही मंत्रिमंडळात कसा? असा सवालच अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केला आहे. भातखळकर यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. त्यामुळे आता मलिकांना मंत्रिमंडळात ठेवलं जाणार की त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नवाब हा दाऊदचा माणूस आहे. तरीही तो मंत्रिमंडळात आहे. याची दोन महत्वाची कारण म्हणजे पवार आणि ठाकरे… असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी का केली जात नाही, असा सवालच भातखळकर यांना या ट्विटमधून ठाकरे सरकारला विचारायचं आहे.
ईडीची सत्यता धोक्यात
दरम्यान, काँग्रेस नेते भाई जगताप यांनी या प्रकरणावर बोलणं टाळलं आहे. हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे त्यामुळं मला बोलता येणार नाही. मात्र ईडीची सत्यता धोक्यात आली आहे. हंदी काढणाऱ्यांच्या घरी ही आता ईडी जात आहे, अशी टीका भाई जगताप यांनी केली आहे.
मुंडेंचे कानावर हात
मलिक यांच्याबाबत कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणाची आपल्याला माहिती नसल्याचं सांगत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी कानावर हात ठेवले आहेत. नवाब मलिकांबाबत कोर्टाने जे निरीक्षण नोंदवले याबाबत मला काहीही माहिती नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले. माहिती घेऊनच या प्रकरणावर बोलतो, असंही त्यांनी सांगितलं.
मलिक हेच दाऊद
नवाब मलिक हे दाऊद गँगचे सदस्य आहेत हे सिद्ध झाले आहे. जेलमध्ये गेल्या नंतर नवाब मलिक यांना मंत्री कायम ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे पण दाऊदशी संबंध आहेत का? या बाबत उद्धव ठाकरे यांनी स्पष्टता करावी. उद्धव ठाकरे यांचे पिताजी बाळासाहेब ठाकरे यांनी हजार वेळा सांगितलं असेल की शरद पवार आणि दाऊदचे संबंध आहेत .मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची पार्टनरशिप केली. गोवावाला कंपाऊंडमध्ये जे आर्थिक व्यवहार झाले, करोडो रुपयाची प्रॉपर्टी काही लाखात नवाब मलिक यांना कशी काय मिळाली. मलिक हेच दाऊद आहेत. तरी ते मंत्रिमंडळात कसे? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.