नामांतरण आणि श्रेयवाद, पण उस्मानाबादचं नाव धाराशिव आणि औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगरच का?
औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव आता अधिकृतपणे बदललं. पण शहर आणि जिल्ह्याच्या नावावरुन पुन्हा काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. त्यावरुनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली.
मुंबई : अखेर औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव असं नामांतरण अधिकृतपणे झालंय. केंद्रानं पत्रक काढलं आणि जल्लोषही सुरु झाला. पण केंद्राच्या पत्रकाचा दाखला देत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सवाल उपस्थित केला. याचाच अर्थ औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर, हे औरंगाबाद जिल्ह्यात करण्यात आलंय. मग शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर तर जिल्ह्याचं नाव औरंगाबाद कसं? असा सवाल अंबादास दानवेंनीही उपस्थित केला. पण त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत, कंन्फ्यूजन दूर केलंय.
शहराचं नाव बदलण्यासाठी केंद्रानं पत्रक काढलं. आता महसूल विभाग जिल्ह्याचं नाव बदलण्यासाठी पत्रक काढणार. त्यामुळं शहर, तालुका आणि जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगरच असेल. नामांतरण होताच, शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात औरंगाबाद नाव पुसण्यासाठी नामांतरणाचे स्टिकर लावले. नामांतरणावरुन आजवर दर 5 वर्षांनी महापालिकेची निवडणूक तापत होती. पण अखेर औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालंय.
औरंगबाद शहराचा इतिहास काय?
औरंगाबाद शहराचं जुनं नाव आधी राज तडाग आणि नंतर खडकी, मलिक अंबर, फतेहनगर, आणि नंतर नवरंग नगर झालं. 1636 मध्ये औरंगजेब हा मुघल बादशाह झाला. औरंगजेबनं 1653मध्ये शहराचं नाव बदलून औरंगाबाद केलं. सध्या औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबादमध्येच समाधी आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं मूळ वतनदारीचं गाव औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळ हे गाव आहे.
औरंगजेबानंच छत्रपती संभाजी महाराजांना क्रूरतेनं मारलं. त्यामुळं औरंगजेबाची ओळख पुसून काढण्यासाठी औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी झाली. पण या नामांतरणाला MIMचे स्थानिक खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केलाय.
इकडे नामांतरणावरुन, श्रेयवादही सुरु झालाय. शिंदेंच्या बंडानंतर शेवटच्या कॅबिनेटमध्ये उद्धव ठाकरेंनी संभाजीनगर आणि धाराशीव असे 2 प्रस्ताव पास केले होते. पण ठाकरे सरकारच्या प्रस्तावातील त्रुटी काढत, शिंदे-फडणवीस सरकारनं नव्यानं कॅबिनेटमध्ये प्रस्ताव पास करुन केंद्राला पाठवले.
उस्मानाबाद शहराता इतिहास काय?
औरंगाबाद बरोबरच उस्मानाबाद शहराचंही नाव, धाराशीव करण्यात आलंय. आता धाराशीव नाव कसं पडलं तेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा राक्षस होता. धारासूराने भगवान शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. पण लोकांना त्रास देण्यास सुरुवात केल्यानंतर सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला. तेव्हापासून धाराशीव नाव पडल्याची आख्यायिका आहे.
हैदराबादचे 7 वे मीर उस्मान अली खान यांच्या नावावरुन शहराला उस्मानाबाद हे नाव मिळालं. नामांतरण झाल्यानं आता निवडणुकीत हा मुद्दा नसेल. पण नामांतरणाच्या श्रेयवादावरुन आतापासूनच सामना सुरु झालाय.