MLC Election 2022: पवार, बाजोरियांचा पराभव जिव्हारी, सेना आमदार म्हणतात, काँग्रेस, राष्ट्रवादीला मते कशाला द्यायची?
MLC Election 2022: शिवसेनेची मते शिवसेनेच्याच आमदारांना मिळायला हवी. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना अतिरिक्त मते कशाला द्यायची? असा सवाल शिवसेना आमदारांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.
नागपूर: राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील नेते एकदिलाने विधान परिषदेची (Maharashtra MLC Election) निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, विधान परिषद निवडणूक उद्यावर आलेली असतानाच आघाडीतील धुसफूस समोर आली आहे. राज्यसभा निवडणुकीत संजय पवार यांचा झालेला पराभव आणि त्या आधी विधान परिषदेच्या निवडणुकीत गोपीकिशन बाजोरिया यांचा झालेला पराभव शिवसेना आमदारांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना मतदान कशाला करायचं? असा सवाल शिवसेनेचे आमदार करत आहेत. शिवसेनेच्या उमेदवारालाच शिवसेनेची (shivsena) मते मिळायला हवीत, असं शिवसेनाआमदार म्हणत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. त्यातून मुख्यमंत्री कसा मार्ग काढतात त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेची मते शिवसेनेच्याच आमदारांना मिळायला हवी. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना अतिरिक्त मते कशाला द्यायची? असा सवाल शिवसेना आमदारांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेकडे 8 अतिरिक्त मते आहेत. त्यामुळे ही मते काँग्रेस-राष्ट्रवादीकडे जाणार का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
दुसरा उमेदवार अडचणीत?
विधान परिषद निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे अतिरिक्त मते आहेत. काँग्रेसकडे अतिरिक्त मते नाहीत. मात्र, काँग्रेसच्या दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला 17 मते हवी आहेत. एमआयएमने एक मत काँग्रेसला देणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराकडे 18 मते आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराला अजून 9 मतांची गरज आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने अतिरिक्त मतांची बेगमी पुरवल्यास काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात आहे. पण शिवसेनेच्या आमदारांनी वेगळीच भूमिका घेतल्याने काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचं दबावतंत्र?
काँग्रेसला शिवसेनेच्या चार अतिरिक्त मतांची गरज आहे. ही मते मिळावीत म्हणून काँग्रेसने दबावतंत्र सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. या चार मतांसाठी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढवल्याचं सांगितलं जात आहे. तर, कोणत्या पक्षाला किती मते द्यायची? याची रणनीती ठरली आहे. तुम्हाला मतदानाच्या दिवशी ती दिसून येईल, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.