पोलीस अधिकारी पतीकडूनच छळ, पीडित पत्नीने ट्विटरवर मागितली पोलीस महासंचालकांकडे मदत
पोलीस अधिकारी असलेल्या पत्नीकडूनच आपला छळ होत असल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. यासाठी थेट महिलेने ट्विटरवर मदत मागितली आहे.
मुंबई : मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने थेट आपल्या पोलीस पती विरोधात महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली आहे. मागील तेरा वर्षापासून दुसऱ्या स्त्रीशी संबंध असल्याकारणाने पती मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याची तक्रार या महिलेने केली आहे. पतीविरोधात बोरिवलीच्या एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी सहकार्य न केल्याचा आरोप करत महिलेने ट्विट करत मदत मागितली आहे.
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पीएसआय सचिन कांबळे यांच्या 38 वर्षीय पत्नी सई कांबळे यांनी हा आरोप केला आहे. 2019 मध्ये पतीने मोजके कपडे आणि भांडी देऊन सोडून दिल्यानंतर जगण्यासाठी लढाई करावी करत असल्याचं महिलेने म्हटलं आहे.
अनेकवेळा पती फक्त भेटण्यासाठी येत असे मात्र उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे देत नसल्याने सई कांबळे यांना शेजाऱ्यांकडून उसनवारी करून दिवस काढावे लागत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.पतीच्या या वागण्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेल्यानंतरही पोलिसांनी सहकार्य केले नसल्याचा आरोप सई कांबळे यांनी केला आहे.