मुंबई: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याबाबतची त्यांची सुप्त इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. राष्ट्रवादीत मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले डझनभर नेते आहेत. त्यातच शरद पवार यांच्या घरातीलच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे दोन नेते सुद्धा या पदाचे प्रमुख दावेदार आहेत. त्यामुळे पाटील यांचं हे स्वप्न पूर्ण होणार की दिवास्वप्नच राहणार या विषयी घेतलेला हा आढावा. (will jayant patil become maharashtra chief minister?, read special report)
कोण आहेत जयंत पाटील
जयंत पाटील हे राष्ट्रवादीतील महत्त्वाचे नेते आहेत. लोकनेते, स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे चिरंजीव असलेल्या जयंत पाटील यांना घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं. राजारामबापू काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. जयंतरावांना वडिलांकडूनच राजकारणाचे धडे मिळाले. जयंत पाटील उच्च शिक्षित असून परदेशातून शिकून आलेले आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर त्यांचे चांगले प्रभुत्त्व आहे. मृदूभाषी आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांचा लौकीक आहे. कृषी आणि सहकार क्षेत्राचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे एकनिष्ठ तर अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. अर्थमंत्री, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री आदी पदे त्यांनी भूषविली आहेत. पाटील यांनी नऊ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यांनी सांगली जिल्ह्यात अनेक सहकारी संस्थांमार्फत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. सध्या त्यांच्याकडे जलसंपदा खातं आहे. शिवाय राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपदही त्यांच्याकडेच आहे. सांगलीतील इस्लामपूर मतदारसंघातून सलग सातवेळा निवडून येण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे.
आकडे काय सांगतात?
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 मध्ये झाली. त्यावेळी राष्ट्रवादीने विधानसभेच्या 223 जागा लढवल्या होत्या. यावेळी त्यांचा फक्त 58 जागांवर विजय झाला. त्यानंतर 2004 मध्ये 124 जागा लढवून राष्ट्रवादीने 71 जागांवर कब्जा केला. 2009मध्ये 113 जागा लढवून राष्ट्रवादीला केवळ 62 जागा जिंकता आल्या होत्या. 2014मध्ये राष्ट्रवादीची अधिकच घसरण झाली. यावर्षी राष्ट्रवादीने स्वबळावर 278 जागा लढवल्या होत्या. मात्र त्यांना केवळ 42 जागा जिंकता आल्या. त्यानंतर 2019मध्ये राष्ट्रवादीने काँग्रेससोबत आघाडी केली. या निवडणुकीत राष्ट्रवादीने 121 जागा लढवून 54 जागा जिंकल्या होत्या. एकंदरीत 1999 पासून राष्ट्रवादीने पाच निवडणुका लढवल्या. पण एकाही निवडणुकीत त्यांना 80च्या पुढे जाता आले नाही. उलट दिवसे न् दिवस राष्ट्रवादीच्या संख्याबळात कमालीची घट होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणं शक्य नसलं तरी प्रत्येक निवडणूक ही नवीन निवडणूक असते. प्रत्येक निवडणुकीचा कल बदललेला असतो. त्यामुळे काहीही होऊ शकतं, असं राजकीय जाणकार सांगतात.
हे ही दावेदार
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुमारे डझनभर नेते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. त्यामुळे जयंत पाटील मुख्यमंत्री होती का? याबाबत राजकीय निरीक्षकांच्या मनात साशंकता आहे. राष्ट्रवादीत अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, नवाब मलिक, धनंजय मुंडे आदी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले अनेक चेहरे आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदात अनेक अडथळे असल्याचं राजकीय निरीक्षक सांगतात.
अजित पवार, सुप्रिया सुळेंना डावलणार?
उद्या मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आलेच तर या पदासाठी अजित पवार, सुप्रिया सुळे आणि छगन भुजबळ या तीन नावांचाच पक्षातून विचार होऊ शकतो. त्यातही अजित पवार हेच या पदाचे प्रमुख दावेदार असू शकतात, असं जाणकार सांगतात. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हे पक्षाविरोधातील सर्वात मोठं बंड होतं. पक्षशिस्तीच्या बाहेरचं हे प्रकरण होतं. अशावेळी अजित पवारांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवणं अपेक्षित होतं. पण शरद पवार यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं. यातून अजित पवारांचं पक्षातील स्थान, त्यांचं उपद्रव्य मूल्य सिद्ध होतं. शिवाय मुख्यमंत्री होण्याची अजितदादांची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यामुळे जयंत पाटील यांना मुख्यमंत्रीपद मिळणं अशक्यच असल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.
राष्ट्रवादीत स्वप्न पाहणाऱ्यांची लाईन मोठी
मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहणं हा काही गुन्हा नाही. कुणीही पाहू शकतो. त्यासाठी लायसन्स लागत नाही. राष्ट्रवादीत असे स्वप्न पाहणाऱ्यांची लाईन छोटी नाही. शिवाय राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री राहिलेले नेतेही अनेक आहेत. पण वस्तुस्थिती वेगळी आहे. राज्यात भाजप आणि शिवसेना एक नंबर एक आणि दोनचे पक्ष आहेत. तर राष्ट्रवादी हा नंबर तीनचा पक्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहताना 2024मध्ये पक्ष नंबर वन करण्यासाठी राष्ट्रवादीला प्रचंड मेहनत करावी लागेल, असं ‘नवभारत टाइम्स’चे ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू शितोळे यांनी सांगितलं.
सुप्रियांनाच प्राधान्य
उद्या जर राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद गेलं तर मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुप्रिया सुळे यांनाच प्राधान्य देतील. पवार घराण्याचं ठाकरे घराण्याशी कौटुंबीक स्नेह आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना ठाकरेंचं प्राधान्य राहिल. जयंत पाटील यांची उद्धव ठाकरेंशी जवळीक महाविकास आघाडीच्या निमित्ताने वाढली आहे. तोपर्यंत त्यांना उद्धव ठाकरे हे माणूस म्हणून कसे आहेत हे सुद्धा माहीत नव्हतं. त्यामुळे पवार जिथे शब्द टाकतील, त्याच व्यक्तिला उद्धव ठाकरे आपला पाठिंबा देतील हे आलेच, असं शितोळे म्हणाले. तसेच अजित पवार आणि सुप्रिया सुळेंना डावलून शरद पवार इतर कुणाचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार करतील, याची शक्यता फार कमी आहे. अर्थात भविष्यातील परिस्थिती कशी असेल, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. भविष्यात राजकारणात काय होईल, यावर आताच भाष्य करणं तसं घाईचंच होईल, असंही ते म्हणाले. (will jayant patil become maharashtra chief minister?, read special report)
जयंत पाटील यांची वैयक्तिक माहिती
नाव : जयंत राजाराम पाटील
जिल्हा : सांगली
पक्ष – राष्ट्रवादी
वय – 57 वर्षे
शिक्षण – बी.ई.सिव्हिल इंजिनिअरिंग
संपत्ती – 16 कोटी
कुटुंब – पत्नी आणि दोन मुले (will jayant patil become maharashtra chief minister?, read special report)
मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोटhttps://t.co/a510o9qP8j#jayantpatil | #ncp | #maharashtra | #maharashtrapolitics | @Jayant_R_Patil
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 21, 2021
संबंधित बातम्या:
मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
वीज बिलावर ऊर्जामंत्री राऊत बोलले, आता अजित पवार, नेमकं काय होणार?
LIVE | शिवसैनिक शिनोळी गावात पोहोचले, शिवसैनिक-कर्नाटक पोलिसांमध्ये झटापट
(will jayant patil become maharashtra chief minister?, read special report)