मुंबईत महायुतीच्या प्रचार सभेत पंतप्रधान मोदींसोबत दिसणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानंतर आता मनसे नेते महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार करताना देखील दिसणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित राहतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Raj thackeray and PM Modi : राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर पुढची रणनीती ठरवण्यासाठी राज ठाकरे यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर, राज ठाकरेंनी मनसेचे नेते महायुतीचा प्रचार करणार असल्याचंही घोषित केलं. त्यामुळं लवकरच महायुतीच्या मंचावर मनसेचे नेतेही दिसणार आहेत. राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर मनसेच्या नेत्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार कसा करायचा, हेही ठरलं. म्हणजेच पाठिंब्यानंतर मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही प्रत्यक्ष प्रचारात उतरवलं जाणार आहे.
भूमिकेबाबत काय म्हणाले ठाकरे
2014 ला राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा दिला होता. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी मोदींना विरोध केला. आता पुन्हा 2024मध्ये मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यावरुन विरोधकांनी राज ठाकरेंना घेरलं आहे. मात्र आपण भूमिका बदललेली नसून, धोरणांवरची टीका होती असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
चांगली कामं होत असतील तर स्वागत केलं पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले. बिनशर्त पाठिंबा देण्यामागं राज ठाकरेंसाठी राम मंदिराचा मुद्दाही महत्वाचा ठरल्याचं दिसतोय. कारण मोदी नसते तर राम मंदिर झालंच नसतं, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
मोदींवर नाही तर धोरणांवर टीका
खरं तर लोकसभा निवडणुकीची तयारी राज ठाकरेंनीही केली होती. 3-4 महिन्यांआधी मतदारसंघ निहाय आढावा बैठकाही घेतल्या. मात्र निवडणुका घोषित झाल्यावर अचानक गेल्या महिन्यात राज ठाकरे दिल्लीत गेले. चिन्हावरुन फिस्कटलं आणि महायुतीत न येता बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. मात्र आपण भूमिका बदललेली नसून मोदींवर 2019मध्ये धोरणांवरची टीका होती असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
मनसेच्या नेत्यांच्या बैठक झाल्यानंतर राज ठाकरेंनी जी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी राऊतांच्या टीकेलाही उत्तर दिलंय. भाजपनं राज ठाकरेंना कोणती फाईल दाखवली ?, असा सवाल राऊतांनी केला होता.
मनसे महायुतीचा प्रचार करणार हे राज ठाकरेंनीच स्पष्ट केलं. अर्थात स्वत: राज ठाकरेही मुंबईतल्या मोदींसोबतच्या प्रचार सभेत दिसू शकतात.