पुण्याचे व्यावसायिक अविनाश भोसले सीबीआय कोठडीत जाणार की दिलासा मिळणार?, सीबीआय कोर्टात उद्या होणार निर्णय
कोर्टाने अविनाश भोसले यांना 27 मे रोजी नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले .सीबीआयनं भोसलेंची 10 दिवसांकरता सीबीआय रिमांड मागितली होती. मात्र सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकिलांनी रिमांडला विरोध केला.
मुंबई– पुण्याचे व्यवसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosle)यांना सीबीआयने (CBI)अटक केली असून , येस बँक-डीएचएफएल (YES bank-DHFL) फसवणूक प्रकरणी त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय कोर्टात अविनाश भोसले यांच्या सीबीआय रिमांडवर दोन्ही पक्षांची सुनावणी पूर्ण झाली, मात्र न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे उद्या दुपारी बाराच्या सुमारास न्यायालयात या संदर्भात निर्णय देणार आहे. बहुचर्चित येस बँक-डीएचएफएल प्रकरणात अटकेत असलेले पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांनी गैरव्यवहारातील २९२ कोटी रुपये इतरत्र वळवल्याचा आरोप आहे. अविनाश भोसले यांचे अनेक राजकीय नेत्यांचे संबंध असल्याचे सांगण्यात येते.
सीबीआय रिमांडला विरोध
अविनाश भोसलेंतर्फे कोर्टात आज सीबीआय रिमांडला विरोध करण्यात आला. कोर्टाने अविनाश भोसले यांना 27 मे रोजी नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले .सीबीआयनं भोसलेंची 10 दिवसांकरता सीबीआय रिमांड मागितली होती. मात्र सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकिलांनी रिमांडला विरोध केला.
उद्या कोर्ट देणार निर्णय
वेळेअभावी न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून घेत निकाल राखून ठेवला. सीबीआयने अविनाश भोसले यांना 26 मे रोजी पुण्यातून अटक केली होती. त्यानंतर मुंबईतील सीबीआय कोर्टात त्यांना 27 मे रोजी हजर करण्यात आले होते. दरम्यान पुढील सुनावणी मंगळवारी दुपारी १२ वाजता मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टात होणार आहे. यात अविनाश भोसले यांना दिलासा मिळतो की त्यांची रवानगी सीबीआय कोठडीत होते हे पाहणे महत्वाचे आहे.
अविनाश भोसलेंवर काय आहेत आरोप
बहुचर्चित येस बँक-डीएचएफएल प्रकरणात अटक करण्यात आलेले पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांनी गैरव्यवहारातील २९२ कोटी रुपये इतरत्र वळवल्याचा आरोप आहे. याप्रकरणात त्यांना ६८ कोटी रुपये सल्ला शुल्क म्हणून मिळाले असून याबाबत सीबीआय अधिक तपास करत आहे. याप्रकरणी मार्च २०२० मध्ये सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. गैरव्यवहारातील रक्कम बांधकाम व्यवसायिकांच्या मदतीने इतरत्र वळण्यात आल्याचा सीबीआयला संशय आहे. त्या संशयावरून ३० एप्रिलला सीबीआयने बांधकाम व्यवसायिकांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यात अविनाश भोसले यांच्या पुण्यातील एबीआयएल कंपनीशी संबंधीत ठिकाणांचाही समावेश होता.
कोण आहेत अविनाश भोसले
रिक्षावाला ते इस्टेट किंग असा अविनाश भोसले यांचा प्रवास मानला जातो. नगर जिल्ह्यातील संगमनेरचे असलेले अविनाश भोसले पुण्यात आले आणि त्यांनी त्यानंतर पुण्यात जम बसवला. राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे ते सासरे आहेत. कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे ते मालकही आहेत. त्यांचे अनेक राजकीय नेत्यांशी चांगले संबंध असल्याचे सांगण्यात येते.