Devendra Fadanvis: भाजपाच्या मंत्र्यांच्या यादीवर पक्षश्रेष्ठी करणार शिक्कामोर्तब? फडणवीसांच्या यादीवर मोदी – शाहांची नजर?
ही यादी जरी देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश भाजपाच्या कोअर टीममध्ये फायनल करण्यात येईल, असे सांगण्यात येत असले. तरी दिल्लीत पक्षश्रेष्ठी त्यावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडक्यात शिंदे सरकारमध्ये असलेल्या भाजपाच्या मंत्र्यांची यादी ही नरेंद्र मोदी, अमित शाहा यांच्याकडून शिक्कामोर्तब केलेली असेल.
मुंबई– एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या सरकारमध्ये भाजपाच्या कोणाला मंत्रीपदावर (BJP ministers)संधी मिळणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहचलेली आहे. भाजपाचे अनेक नेते या मंत्रिपदासाठी उत्सुक आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक दिग्गजांनी भाजपात प्रवेश केला होता. आता ही सगळीच मंडळी अडीच वर्षानंतंर मंत्रिपदासाठी उत्सुक असण्याची शक्यता आहे. तसेच भाजपातील जुने निष्ठावंत आणि वरिष्ठही या स्पर्धेत असतील. त्यामुळे भाजपाच्या मंत्र्यांच्या यादीत कोणती नावे असतील, याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे. यातच आता ही यादी जरी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)आणि प्रदेश भाजपाच्या कोअर टीममध्ये फायनल करण्यात येईल, असे सांगण्यात येत असले. तरी दिल्लीत पक्षश्रेष्ठी त्यावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडक्यात शिंदे सरकारमध्ये असलेल्या भाजपाच्या मंत्र्यांची यादी ही नरेंद्र मोदी, अमित शाहा यांच्याकडून शिक्कामोर्तब केलेली असेल.
भाजपात अनेक जण उत्सुक
भाजपात अनेक जण मंत्रिमदासाठी उत्सुक आहेत. त्यात चंद्रकांत दाद पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, नितेश राणे, शिवेंद्र राजे भोसले, राम शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नावांचा समावेश आहे. त्यामुळे सुरुवातीलाच सगळ्यांना मंत्रिमंडळात घेणे शक्य नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच केलेले आहे.
मंत्रिमंडळावर मोदी-शाहांची नजर
शिंदे सरकार स्थापनेवेळी मंत्रिमंडळात बाहेर राहणार असल्याची घोषणा फडणवीसांनी केली, मात्र तीन तासांतच त्यांना केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशाने निर्णय बदलावा लागला. उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांना घ्यावी लागली. याकडे अनेकांनी त्यांच्यातील चाणक्यपणा कमी करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी हे केले अशी टीका केली आहे. पक्षापेक्षा व्यक्ती मोठी झालेली भाजपासारख्या शिस्तप्रिय पक्षाला चालत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच हाच नियम मंत्र्यांच्या यादीवरही असेल असे सांगण्यात येत आहे. फडणवीस आणि राज्यातील टीमने जरी मंत्रिमंडळाची यादी तयार केली, तरी ती यादी मोदी-शाहांकडून शिक्कमोर्तब झाल्याशिवाय अंतिम होणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
फडणवीसांचे पंख छाटण्याचे प्रयत्न?
राज्यात १०६ आमदार निवडून आणत प्रथम क्रमांकाचा मान देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात मिळाला. मात्र सत्ता त्यांना चकवा देऊन गेली. विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीसांनी जीवाचं रान करत सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडलं. गोवा निवडणुकीची जबाबदारीही उत्तमपणे पेलली. रज्यसभेत आणि विधान परिषदेत विजय मिळवून दिला. एकनाथ शिंदेंच्या बंडाला पडद्या आड पाठिंबाही दिला. मात्र इतकं करुनही किंमगमेकरच्या भूमिकेत जाऊ इच्छिणाऱ्या फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावत, मोदी-शाहांनी त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते आहे. पाच वर्ष सत्तेत असताना फडणवीसांना जे स्वातंत्र्य होतं, त्यात त्यांनी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनाही रोखलं होतं. आता तितकं स्वातंत्र्य त्यांना मिळेल का, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येते आहे.