मुंबई – सत्ता स्थापना झाल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाबाबत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या शिवसेनेकडून थोडी नरमाईची भूमिका दिसते आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांकडूनही उद्धव ठाकरे यांच्याविरोधात टीका झालेली नाही. उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यायला लागू नये, अशी इच्छा होती, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar)आधीपासूनच सांगत होते. मात्र या दोन्ही गटांमध्ये संजय राऊत यांच्यावरुन वाद वाद आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर राऊत यांनी बंडानंतर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे आता बंडखोर आमदार मतदारसंघात परतल्यानंतर संजय राऊत यांना लक्ष्य करताना दिसत आहेत. संजय राऊत हे शरद पवार यांचे एजंट असल्याची टीका करत , राऊत शिवसेना संपवायला निघाले आहेत अशी टीका सातत्याने या आमदारांकडून करण्यात येते आहे. उद्धव आणि आदित्य ठाकरेंबाबत मात्र आदरामुळे ते टीका करताना दिसत नाहीयेत. अशा स्थितीत पुन्हा एकदा शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
दीपक केसरकर यांना उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर जाणार का, असा प्रश्न विचारला असता, उद्धव ठाकरे भेटणार असतील तर नक्कीच मातोश्रीवर जाऊ, पण आम्ही थेट उद्धव ठाकरेंशीच बोलू असे ते म्हणाले आहेत. पुन्हा एकत्र यायचं असेल तर आता आमच्या कुटुंबात भाजपाही आहे, त्यांच्याशी बोलून निर्णय करु असे केसरकर म्हणाले आहे. तर संजय राठोड यांना हा प्रश्न विचारला असता, त्यांनी आत्ता उद्धव ठाकरेंना आमची भूमिका आवडली नसेल, एक दोन महिन्यात, सहा महिन्यांत त्यांना ती पटेल, जेव्हाही मातोश्रीचे दरवाजे उघडतील तेव्हा आम्ही उद्धव यांच्याकडे नक्की जाऊ असे म्हणाले आहेत. या दोन आमदारांच्या वक्तव्यांमुळे पुन्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार का, या चर्चांना जोर मिळाला आहे.
दुसरीकडे तह करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या काही वरिष्ठ नेते आणि खासदारांकडूनही होत असल्याची चर्चा आहे. खासदारांच्या बैठकीत एका वरिष्ठ नेत्याने पक्षाच्या हितासाठी एकनाथ शिंदेंसोबत सह करावा असा सल्ला उद्धव ठाकरेंना दिल्याची माहिती आहे. मात्र उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया मात्र अद्याप समजू शकलेली नाही. उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटाच्या आणि फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा समेटाचे प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अमरातवतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. आनंदराव अडसुळांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांनी सांगितले आहे की ते एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. आपले वडील शिवसैनिकच राहतील असेही त्यांनी सांगितले आहे.