अध्यक्षांना पत्र लिहिणे म्हणजे दबाव नव्हे, अनिल परब यांनी सुनावले
पत्र लिहिणे म्हणजे दबाव नव्हे. अध्यक्ष काहीतरी चुकीचे करतात असं वाटत असेल, तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात न्याय मागू, असा इशाराही अनिल परब यांनी दिला.
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. स्वतंत्र न्याय प्रक्रियेला बाधा आणण्याचा प्रयत्न केला जातो, असंही ते म्हणाले. यावर प्रतिक्रिया देताना अनिल परब म्हणाले, विधानसभा अध्यक्षांवर दबाव कुणीही आणू शकत नाही. परंतु, अध्यक्षांना पत्र लिहिण्याचे काम आम्हाला करावेच लागेल. त्याच्यात काय दबाव आहे, असा सवाल परब यांनी विचारला. पत्र लिहिणे म्हणजे दबाव नव्हे. अध्यक्ष काहीतरी चुकीचे करतात असं वाटत असेल, तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात न्याय मागू, असा इशाराही अनिल परब यांनी दिला.
दबावाचा प्रश्न येतो कुठं?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हातातला पेन घेऊन आम्ही काही लिहून घेणार नाही. मग, दबावाचा प्रश्न येतो कुठं. आम्ही मागणी करणार. मागणी करणे हे काही चुकीचे नाही. लवकरात लवकर सुनावणी घ्या, अशी मागणी करणे यात चूक काय आहे. त्यांनी नियमाप्रमाणे करावं. त्यांनी नियम मोडला तर आम्ही कोर्टात जाणार, असंही अनिल परब यांनी सुनावलं.
नियमाप्रमाणे काय होते ते आम्हालाही माहीत
राहुल नार्वेकर यांनी नियमाप्रमाणे करावं. नियमाप्रमाणे काय होते आणि काय होत नाही, हे आम्हालाही चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे नार्वेकर यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न नाहीय. पण, लवकरात लवकर करावं, अशी मागणी करणे यात काही चूक आहे, असं आम्हाला वाटत नाही, असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं.
नैतिकतेच्या गोष्टी करणे उद्धव ठाकरे यांनी करून नये, असं देवेंद्र फडणवी म्हणाले. त्यावर बोलताना अनिल परब म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी सकाळी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्यामुळे यावर मी बोलणे योग्य होणार नसल्याचं अनिल परब यांनी म्हंटलं.
सुनावणी होईल त्यावेळी मुद्दे मांडणार
पक्ष आणि चिन्ह यांचा निर्णय निवडणूक आयोगानं शिंदे गटाला दिला. याच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत. कालच्या निकालात निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाबाबत काही उल्लेख केला आहे. ज्यावेळी सुनावणी होईल, त्यावेळी सर्व मुद्दे मांडणार आहोत, असं अनिल परब यांनी सांगितलं.