‘मुखवटा घातलेल्या मित्रापेक्षा ओळखीचा शत्रू नेहमीच चांगला’, काँग्रेस आमदाराचा ठाकरेंना खोचक टोला
लोकसभा निवडणुकीच्या अजून पहिल्या टप्प्यातीलदेखील मतदान अद्याप पार पडलेलं नाही. आताशी जागावाटप ठरत आहे. जागावाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यावर येत असताना महाविकास आघाडीत बिघाडी होताना दिसत आहे. कारण ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमदेवारांच्या यादीवर काँग्रेसकडून विरोध केला जातोय. हा विरोध आता खोचक शब्दांमधून केला जाताना दिसतोय.
ठाकरे गटाकडून आज उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण या यादीवर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे. कारण ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन जागांवर काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. या मतदारसंघांबाबत पूर्ण चर्चा झालेली नसताना ठाकरे गटाने परस्पर उमेदवारांची घोषणा केली, असा दावा काँग्रेसचा आहे. काँग्रेस नेत्यांच्या दाव्यानुसार, सांगलीची जागा ही काँग्रेसला बालेकिल्ला आहे. या जागेसाठी काँग्रेस नेते विश्वजीत कदम हे पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीला गेले आहेत. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे सांगलीच्या जागेबाबत मागणी केली आहे. तर दुसरीकडे उत्तर पश्चिम मुंबई जागेवरुन काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी रोष व्यक्त केला आहे. आपण ठाकरे गटाच्या उमेदवाराचं काम करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या यादीवरुन काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी शिवसेना ठाकरे गटावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.
“मुखवटा घातलेल्या मित्रापेक्षा ओळखीचा शत्रू नेहमीच चांगला असतो. काँग्रेसला खरंच शिवसेना उद्धव ठाकरे गटाला समजून घेण्याची गरज आहे”, असं ट्विट झिशान सिद्दीकी यांनी केलं आहे. झिशान सिद्दीकी यांनी याबाबत आणखी एक ट्विट केलं आहे. “ठाकरे गट सांगली आणि मुंबई पश्चिमच्या जागेचे उमेदवार जाहीर करणं हे दर्शवतं की ते त्यांचा मित्र पक्ष म्हणून काँग्रेसला किती महत्त्व देतात आणि आदर करतात. ठाकरे गटाविरोधात बोलल्यामुळे माझ्यावर टीका होत आहे. पण एक दिवस लोकांना कळेल की ही युती महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचंच कसं नुकसान करत आहे”, असं झिशान सिद्दीकी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
A known enemy is always better than a masked friend. Congress really needs to understand that about Shiv Sena UBT
— Zeeshan Siddique (@zeeshan_iyc) March 27, 2024
झिशान सिद्दीकी यांच्या या ट्विटवर आता शिवसेना ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण महाविकास आघाडीत जागावाटपावरुन तिढा अद्यापही कायम असल्याचं या निमित्ताने बघयला मिळत आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या यादीवर प्रतिक्रिया दिली आहे.
‘शिवसेनेसोबत दोन ते तीन जागांवर चर्चा सुरू’
“शिवसेनेसोबत आमची दोन ते तीन जागांवर चर्चा सुरू आहे. त्यातली एक जागा सांगलीची आहे. तीन-चार दिवसांपूर्वी त्यांनी प्रचारसभेच्या दरम्यान सांगलीतील त्यांच्या पक्षाचा उमेदवार जाहीर केला. मुंबईत किमान दोन जागा काँग्रेसने लढाव्यात असा आमचा आग्रह आहे आणि त्याबाबत आमची शिवसेनेसोबत चर्चा सुरू आहे. चर्चेतून मार्ग निघेल असं आम्हाला वाटतं. सांगलीमधील कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे की ही जागा काँग्रेसच्या उमेदवाराने लढावी. तसेच मुंबईला देखील खूप वर्ष काँग्रेसचे वर्चस्व होतं. मुंबईत आम्हाला सहापैकी किमान दोन जागा लढण्याची संधी हवी जिथे आमची ताकद आहे तिथे आमच्या उमेदवार जिंकू शकतो”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
‘महाविकास आघाडी पुढे जाण्यासाठी किरकोळ विषय सोडले पाहिजे’
“केवळ आकडा वाढवण्यासाठी उमेदवार उभे करायचे यात काही अर्थ नाही हे शिवसेनेने समजून घ्यावं. ज्यांनी अर्ज केलेला असतो आणि त्यांची प्रबळ इच्छा असते लोकसभा निवडणूक लढवण्याची, त्यांना या सगळ्या जागा घोषित झाल्यामुळे त्रास होतोच. पण ताकदीने महाविकास आघाडी पुढे जाण्यासाठी किरकोळ विषय सोडले पाहिजे आणि ते सोडतील अशी खात्री आहे”, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
“हातकणंगलेची जागा ही शिवसेनेकडे आहे त्यांनी ती जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचा निर्णय घेतला. राजू शेट्टी ही जागा लढवत आहेत. ते जर आघाडीत येणार नसतील तर आमची काही हरकत नाही. पण त्यापूर्वी त्यांनी निवडून आल्यावर कुठल्याही परिस्थितीत भाजपबरोबर ते जाणार नाही, असा आश्वासन आम्हाला द्यायला हवा. जर त्यांना मविआची मदत हवी असेल तर किमान आश्वासन द्यायला हवं”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.