भाजप आमदार हरीश पिंपळे यांचा रुद्रावतार, विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना गेस्ट हाऊसमध्ये डांबलं
अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेचे पैसे 530 शेतकऱ्यांना मिळाले नाहीत म्हणून रोष व्यक्त केला. 2023 मध्ये 530 शेतकऱ्यांना विमा लाभ मिळाला नाही, यामुळे ते संतप्त झाले आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना गेस्ट हाऊसमध्ये कोंडून ठेवलं. अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर अधिकाऱ्यांना सोडण्यात आले, पण आठ दिवसांत शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत तर तीव्र आंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला.
अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूरमध्ये भाजप आमदार हरीश पिंपळे यांचा रौद्रावतार बघायला मिळाला. आमदार पिंपळे यांनी विमा कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुर्तीजापुर येथील शासकीय विश्रामगृहाच्या खोलीत अक्षरश: डांबलं. तर विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे 2023 मधील 530 शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी विमा योजनेचा लाभ मिळाला नाही. त्याच्याच रागातून आमदार हरीश पिंपळे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विश्रामगृहाच्या खोलीत डांबलं. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत अधिकाऱ्यांना खोलीतून बाहेर काढणार नसल्याचा निर्धार आमदार पिंपळे यांनी केला.
विशेष म्हणजे याच वेळी घटनास्थळावर पोलीस आणि महसूल अधिकारी दाखल झाले. त्यांनी आमदार हरीश पिंपळे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी आमदार हरीश पिंपळे यांच्यासोबत बातचित करत विमा कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुक्त करण्याची मागणी केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत महत्त्वाचं आश्वासनही दिलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हरीश पिंपळे यांनी विमा कंपनीच्या अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना मुक्त केलं.
जिल्हाधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं?
विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे 2023 मधील 530 शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ मिळाला नाही. त्याच्याच रागातून आमदार हरीश पिंपळे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विश्रामगृहाच्या खोलीत डांबल होतं. जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसांत हा प्रश्न मार्गी लावतो, असं आश्वासन दिलं. यानंतर आमदार हरीश पिंपळे यांनी विमा कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुक्त केलं. पुढच्या आठ दिवसात त्या 530 शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदारांनी दिला आहे.
आमदारांची प्रतिक्रिया काय?
आमदार हरीश पिंपळे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. “2023 चा सोयाबीनचा विम्यासाठी 546 शेतकऱ्यांची यादी तयार झाली. संबंधित शेतकऱ्यांना विमा मिळावा यासाठी एक बैठक मुंबईत पालकमंत्री आणि महसूलमंत्री यांच्यासोबत झाली होती. दोन बैठका कलेक्टरांनी घेतल्या होत्या. पुण्याच्या आयुक्तांना ब्लॅकलिस्टचा प्रस्ताव केला आहे. त्यांना विमा द्यायला हवा यासाठी आजदेखील परत बैठक झाली. पण त्यांनी सांगितलं की, आम्ही यादी टाकली आणि पैसे टाकले. जेव्हा आम्ही यादी चेक केलं तेव्हा एकाही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आले नव्हते. त्यामुळे विम्याच्या प्रतिनिधींना आज गेस्ट हाऊसला कोंडून ठेवलं होतं. आता कलेक्टरांच्या कार्यालयात बैठक झाली. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत विषय मार्गी लावू, असा शब्द दिला. शेतकऱ्यांना विम्याचे पैसे आठ दिवसांत मिळाले तर ठीक आहे. नाहीतर या विमा कंपनीच्या विरोधात मी अजून तीव्र आंदोलन छेडेल”, असा इशारा हरीश पिंपळे यांनी दिला.