Nagpur Violence: नागपूरकरांसाठी सहा दिवसानंतर चांगली बातमी, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
Nagpur Violence: नागपुरात संचारबंदी पूर्णपणे उठवली आहे. त्यामुळे आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. 23 मार्च रोजी दुपारी 3 वाजता संचारबंदी पूर्णपणे उठवल्याचे नागपूर पोलिसांनी सांगितले. परंतु काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त कायम असणार आहे.

Nagpur Violence: नागपुरात 17 मार्चच्या रात्री दोन गटात हिंसाचार झाला होता. धार्मिक दंगलींचा फारसा इतिहास नसलेल्या शांत शहर अचानक पेटले होते. या हिंसाचारात एक जणाचा मृत्यू झाला होता. 20 दुचाकी, 40 चारचाकीचे आणि 2 क्रेन जाळण्यात आल्या आहेत. अनेकांची घरे जाळण्यात आली होती. या हिंसाचार प्रकरणात 105 जणांना अटक करण्यात आली होती. त्यात काही अल्पवयीम मुली आहेत. या प्रकरणी आता पोलिसांनी नागरिकांना चांगली बातमी दिली आहे. 23 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपासून नागपूर शहरातील संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे.
नागपुरात संचारबंदी पूर्णपणे उठवली आहे. त्यामुळे आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. 23 मार्च रोजी दुपारी 3 वाजता संचारबंदी पूर्णपणे उठवल्याचे नागपूर पोलिसांनी सांगितले. परंतु काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त कायम असणार आहे. संवेदनशील ठिकाणी हा बंदोबस्त असणार आहे. तसेच परिस्थिती पाहून बंदोबस्तात बदल होणार असल्याचे पोलिसांनी माध्यमांना सांगितले. नागपूर हिंसाचार प्रकरणात सोशल मीडियावर भडकवणारे व्हिडिओ टाकणाऱ्या हमीद इंजिनिअर अन् मोहम्मद सहजाद खान यांना अटक करण्यात आली आहे.
नागपूर शहरातील हिंसाचाराच्या घटनेनंतर शहरातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. संचारबंदी लावल्याने हिंसाचार ग्रस्त भागात पोलीस बंदोबस्तामुळे वर्दळ थांबली होती. परंतु आता शहर पूर्वपदावर येत आहे. नागपुरात बाजारपेठही सुरु झाली आहे. वर्दळ सामान्य होऊ लागली आहे. नागपूर पोलिसांनी संचारबंदी उठवली असली तरी परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत. महाल, गांधीबाग, इतवारी या भागात नागपूर शहरातील मोठ्या आणि जुन्या होलसेल बाजारपेठ आहेत, त्या ठिकाणी पोलिसांचे लक्ष आहे. नागपुरातील संचारबंदीमुळे पहिल्याच दिवशी सुमारे 250 कोटींचा व्यापार प्रभावित झाला होती.
नागपूरच्या महाल परिसरात दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणानंतर नागपुरातील परिमंडळ 3 , 4 आणि 5 मध्ये संचारबंदी लागू करण्यात होती. यात परिमंडळ 3 मधील कोतवाली, गणेशपेठ, तहसील लकडगंज पाचपवली, शांतीनगर तर परिमंडळ 4 मधील सक्करदरा, नंदनवन आणि इमामवाडा आणि परिमंडळ 5 मधील यशोधरा नगर, कपिल नगर पोलीस स्टेशनहद्दीचा समावेश होता. आता ही सर्व संचारबंदी उठवण्यात आली आहे. यातील अनेक भागांची संचारबंदी यापूर्वीच टप्प्या टप्प्याने उठवण्यात आली होती.