Nagpur flood | नागपुरात मुसळधार पावसामुळे पूल खचला, वाहतूक ठप्प, नाग नदीला पूर
Nagpur rain flood | नागपुरात झालेल्या पावसामुळे हाहा:कार उडाला आहे. विजांच्या कडकडाटासह शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी प्रचंड पाऊस झाला. या पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आणि त्याचे पाणी शहरात शिरले आहे.
नागपूर | 23 सप्टेंबर 2023 : नागपुरात पावसामुळे पुन्हा हाहा:कार उडाला आहे. ढगफुटीसदृश्य झालेल्या या पावसामुळे नागपूरकर हवालदिल झाले आहेत. शहरात ठिकठिकाणी पाणी भरल्यामुळे आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. लष्कराचे आणि अग्निशमन दलाचे जवानांनी सूत्र हात घेतले असून मदत कार्य सुरु केले आहे. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त घटनास्थळी दाखल झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तात्काळ मदतकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. नागपुरातील पंचशील चौक ते झाशी राणी चौकाला जोडणारा नाग नदीवरील पूल कोसळला आहे.
मुसळधार पावसामुळे खचला पूल
नागपूर शहरात मुसळधार पाऊस झाला आहे. सकाळी 5.30 पर्यंत 106.7 मिमी पाऊस झाल्याची नोंद हवामान विभागाने केली. शहरातील मोर भवन येथे असलेले सिटी बस स्टॉप पाण्यात बुडाले आहे. यामुळे बससेवेवर परिणाम झाला आहे. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. नाग नदीला पूर आला आहे. या पावसामुळे नाग नदीवर असलेला पूल खचला आहे. हा पूल खचल्यामुळे या ठिकाणांवरुन होणारी वाहतूक पूर्ण बंद केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या ठिकाणी भेट दिली. अतिशय रहदारीचा असणारा हा रस्ता बंद झाल्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
मुलींच्या वसतीगृहात शिरले पाणी
नागपुरातील गांधी नगर येथील शासकीय मुलींच्या वसतीगृहात पाणी शिरले आहे. मनपाच्या अग्निशमन विभागाने ५० मुलींचे रेस्क्यू ॲापरेशन केले आहे. मुलींना रेस्क्यू करुन बाहेर काढले असून त्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवले आहे. शहरातील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले असल्यामुळे किचन बंद झाले आहे.
रामदास पेठ, शंकर नगर भागात पाणी
नागपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या मोर भवन सिटी बस स्टॉपमध्ये पाणी साचल्यामुळे अनेक बस पाण्याखाली आल्या आहेत. शहरातील कळमना वस्तीमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. नरेंद्र नगरसह सगळे अंडर ब्रिजमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रामदास पेठ, शंकर नगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अंबाझरी परिसर आणि पिवळी नदी परिसरातून नागरिकांना रेस्क्यू करण्यात आले आहे.