नागपूर हिंसाचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित दौरा होणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…
नागपूरमधील हिंसाचार हा एका भागांत झाला होता. संपूर्ण शहर शांत आहे. ८० टक्के नागपूर शहर शांत आहे. आता ज्या भागात हिंसाचार झाला होता त्या भागातील परिस्थिती सुरळीत झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित दौरा होणार आहे.

Nagpur Violence CM Devendra Fadnavis Press Conference: राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये हिंसाचाराची संपूर्ण देशभरात चर्चा आहे. औरंगजेबच्या कबरीच्या निमित्ताने हा हिंसाचार झाला चार दिवसांपूर्वी झाला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ३० मार्चला नागपूर दौरा आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील अशांततेच्या वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले, नागपूरमधील हिंसाचार हा एका भागांत झाला होता. संपूर्ण शहर शांत आहे. ८० टक्के नागपूर शहर शांत आहे. आता ज्या भागात हिंसाचार झाला होता त्या भागातील परिस्थिती सुरळीत झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित दौरा होणार आहे. त्याला कोणतीही अडचण येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हिंसाचार प्रकरणात १०४ आरोपींची ओळख पटली आहे. त्यातील ९२ जणांना अटक करण्यात आली. जोपर्यंत शेवटच्या दंगेखोराला पकडले जात नाही तोपर्यंत अटक सत्र सुरू राहील. आरोपींपैकी काही जण अल्पवयीन आहेत. जोपर्यंत दंगलखोरांना धडा शिकवत नाही, तोपर्यंत कारवाई सुरू राहील. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यांच्यावर कडक गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा देणार आहे. सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट टाकल्यामुळे हा हिसांचार झाला. सोशल मीडियावरील ६८ पोस्ट शोधून त्या डिलिट करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.




बांगलादेशी अँगलबाबत मुख्यमंत्री म्हणाले…
नागपूर हिंसाचार प्रकरणात बांगलादेश अँगल असल्याची चर्चा सुरु आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले. ते म्हणाले, याबाबत तपास सुरू आहे. काही पोस्ट बांगलादेशी असल्याचे वाटत आहे. पण त्याचा तपास अद्याप पूर्ण झाला नाही. यासंदर्भात जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत काही सांगता येणार नाही. या प्रकरणात ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना दोन-तीन दिवसांत मदत केली जाणार आहे. गरज पडली तर दंगलखोरांची संपत्ती जप्त केली जाईल. दंगलखोरांच्या घरांवर बुलडोझर चालवला जाईल, असे फडणवीस यांनी म्हटले.