नागपुरात काय घडलंय तुम्हाला माहीतही नसेल, अवघ्या 4 तासात किती पाऊस?; देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट काय?
नागपुरात काल मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह प्रचंड पाऊस पडला आहे. त्यामुळे नागपुरातील सखल भागात प्रचंड पाणी साचलं आहे. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाचं पाणी शहरात शिरलं आहे. त्यामुळे शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
नागपूर | 23 सप्टेंबर 2023 : नागपुरात काल मध्यरात्री प्रचंड पाऊस पडला आहे. विजांच्या कडकडाटासह ढगफुटी झाली. त्यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरलं आहे. तर काही भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे हाल झाले आहेत. एसटी स्टँडमध्येही पाच ते सात फूट पाणी शिरलं आहे. पुलाखालीही प्रचंड पाणी भरल्याने कार पाण्यात बुडाल्या आहेत. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे. आजची सकाळ नागपूरकरांसाठी अत्यंत त्रस्त करणारी ठरली आहे. दुसरीकडे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केलं आहे.
नागपुरात कालपर्यंत पाऊस बेतास पडत होता. फार मुसळधार नव्हता. पण पावसाने संततधार लावली होती. मात्र, जसजशी संध्याकाळ झाली तसतसा पावसाने जोर धरला आणि मध्यरात्री तर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अवघ्या काही तासातच अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. तलावाचं पाणी थेट सीताबर्डी परिसरात शिरलं आहे.
सीताबर्डी परिसरात पाणी शिरल्याने नदीचं स्वरुप आलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. कार, बाईक्स पाण्यात बुडाल्या आहेत. दुसरीकडे मोरभवन येथील एसटी स्टँडला तर नदीचं स्वरुप आलं आहे. एसटी स्टँडमध्ये पाच ते सहा फूट पाणी साचलं आहे. या पाण्यात सात ते आठ बस अडकल्या असून बसवर अडकलेल्या वाहक आणि चालकांना बाहेर काढण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.
चार तासात 100 मिमी पाऊस
चंद्रनगर जुनापारडी नाका पूर्व नागपूर येथेही पावसाचं पाणी शिरलं आहे. मोरभवन लगतच्या पुलाखाली पाणी भरल्याने कार पाण्यात बुडाल्या आहेत. तसेच वाहतुकीची कोंडीही झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून या पावसाची माहिती दिली. नागपुरात अवघ्या 4 तासात 100 मिमीहून अधिक पाऊस पडल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणावर पाऊस झाल्याने नागपुरातील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मला दिली. नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 23, 2023
आधी त्यांना मदत करा
नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफची दोन पथके बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली आहे.