Nagpur महाआवास अभियान : 2 लाख 23 हजार घरकुले पूर्ण, भूमिहीन कुटुंबांना प्राधान्य
घरकुल नसलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबांना महा आवास अभियानांतर्गत घरकुल बांधकामाचे महत्त्वाकांक्षी अभियान विभागात राबविण्यात येत आहे. विभागात पहिल्या टप्प्यात 2 लाख 23 हजार घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
नागपूर : विभागातील घरकुल नसलेल्या कुटुंबांना महाआवास अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात 90 हजार घरकुले उपलब्ध करून देण्यात येत आहेत. येत्या वर्षभरात घरकुलाच्या बांधकामाचे नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महाआवास अभियान-2 उपक्रमाचे नियोजन तसेच घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी विभागीय टास्क फोर्सची बैठक विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे-वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती लवंगारे-वर्मा बोलत होत्या.
2 लाख 23 हजार घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण
घरकुल नसलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबांना महा आवास अभियानांतर्गत घरकुल बांधकामाचे महत्त्वाकांक्षी अभियान विभागात राबविण्यात येत आहे. विभागात पहिल्या टप्प्यात 2 लाख 23 हजार घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात 31 मार्च 2022 पर्यंत 90 हजार घरकुल बांधण्यात येणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 60 हजार 498 तर राज्य पुरस्कृत आवास अंतर्गत 29 हजार 473 घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
घरकुल बांधकामासाठी 50 हजारांचे अनुदान
महाआवास अभियानांतर्गत घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल व जिल्हा परिषद यंत्रणांनी समन्वयाने काम करताना जागेसह बांधकामासंदर्भात येणाऱ्या अडचणी जिल्हास्तरावर सोडविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी दिले. त्या म्हणाल्या की, घरकुल बांधकाम अभियानामध्ये राज्यस्तरावर स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर जास्तीत-जास्त घरकुलाचे बांधकाम करून उत्कृष्ट ठरेल. या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण नियोजन करुन उद्दिष्टपूर्ती करावी. लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी 50 हजार रुपयांचे अनुदान असून लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात निधी जमा होणार आहे. त्यामुळं आधारसोबत बचत खाते लिंक करण्यालाही प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जागा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्या
जागेअभावी घरकुल बांधकाम प्रलंबित आहे. अशा घरकुलांसाठी उपविभागीय महसूल अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले. जमिनीचे एकत्रीकरण (लॅण्ड पुलिंग), बहुमजली इमारतीचे बांधकाम तसेच बांधकामासाठी स्वयंसेवी संस्थांसह लोक प्रतिनिधी आदींचा सक्रिय सहभाग घ्यावा. नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून घराचा दर्जा व गुणवत्ता वाढवावी. शासनाच्या विविध योजनांचा एकत्रित लाभ देवून घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.