फक्त कोंबडा नाही, पैलवान आहे, एकाच फाईटमध्ये समोरचा गारद, पाहा नागपूरचा ‘सुल्तान’!

| Updated on: Jun 15, 2023 | 9:46 PM

नागपुरात सध्या सुल्तान कोंबड्याची चांगलीच चर्चा आहे. अवघ्या एका वर्षाच्या असलेल्या या सुल्तान कोंबड्याचं वजन हे तब्बल सहा किलो इतकं आहे. हा कोंबडा फायटिंगसाठी ओळखला जातोय. तो इतर कोंबड्यांना एका फटक्यात जमिनीवर लोळवतो, असा दावा केला जातोय. विशेष म्हणजे त्याची किंमतीही अगदी तितकीच महाग आहे.

फक्त कोंबडा नाही, पैलवान आहे, एकाच फाईटमध्ये समोरचा गारद, पाहा नागपूरचा सुल्तान!
Image Credit source: tv9
Follow us on

नागपूर : आपण बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा चित्रपट पाहिला असेल. हा चित्रपट कुस्तीवर आधारीत आहे. सलमान खान या चित्रपटातला सुल्तान मल्ल. या चित्रपटाचं उदाहरण देण्यामागील कारणही खास आहे. कारण नागपुरात एका सुल्तानाची चांगलीच चर्चा आहे. हा सुल्तानही कुस्तीच्या आखाड्यात उतरला तर समोरच्याला लोळवल्याशिवाय राहत नाही. पण हा सुल्तान माणूस नाहीय. तर हा सुल्तान एक डॅशिंग कोंबडा आहे. या कोंबड्याची किंमत तब्बल 25 हजार रुपये इतकी आहे. त्यामुळे या कोंबड्याला बघण्यासाठी पंचक्रोशितील नागरिकांची चांगलीच गर्दी जमताना बघायला मिळत आहे.

सावनेर तालुक्यातली किशोर उतखेडे यांचा हा कोंबडा आहे. हा सुल्तान अवघ्या एक वर्षांचा आहे. पण त्याचं वजन तब्बल 6 किलो इतकं आहे. हा सुल्तान खरंच ताकदवान आहे, असा दावा केला जातोय. तो बांग देतो तेव्हा प्रतिस्पर्धी कोंबड्याला फायटिंगसाठी सज्ज असल्याचा सिग्नल देतो, असं सुल्तानचा मालक सांगतो.

जेवणात काजू, बदाम

हा सुल्तान कोंबडा त्याच्या फायटिंगसाठी जास्त प्रसिद्ध आहे. तो त्याच्या एकाच फाईटमध्ये समोरच्या कोंबड्याला जमिनीवर पाडतो, असा दावा केला जातोय. विशेष म्हणजे या सुल्तान कोंबड्याची देखभालही तशीच केली जातेय. या सुल्तानला जेवणात काजू, बदाम दिलं जातं. तसेच त्याला कोंबडीचं एक अंडही खायला दिलं जातं, असं त्याच्या मालकाने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

नागपूरमध्ये पशू प्रदर्शनाच्या ठिकाणी हा सुल्तान कोंबडा आणण्यात आला होता. यावेळी पशू प्रदर्शन पाहायला आलेल्या नागरिकांच्या नजरा सुल्तानकडे खिळल्या. त्यानंतर सुल्तानच्या भोवती मोठा गराडा निर्माण झाला. गर्दी पाहता प्रसारमाध्यमांनी देखील या सुल्तान कोंबड्याची दखल घेतली.

सुल्तानचं वैशिष्ट्य नेमकं काय?

दरम्यान, सुल्तान कोंबड्याचे मालक किशोर उतखेडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. कोंबड्याच्या मालकाला त्याच्या वैशिष्ट्याविषयी विचारण्यात आलं. त्यावर उतखेडे यांनी “हा खेळताना खूप सुंदर खेळतो. तो एक-दोन फटक्यातच समोरचा कोंबडा मारुन देतो, म्हणून त्याची किंमत तशी ठेवली आहे”, अशी प्रतिक्रियाा दिली.

यावेळी कोंबड्याच्या मालकाला किंमत नेमकी किती ठरवलीय? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी खरंतर किंमत अद्याप ठरवलेली नाही. पण आपल्याला 25 हजार रुपयात या कोंबड्याची मागणी आली असल्याचं सांगितलं.

“सुल्तान कोंबड्याला खाण्यासाठी कोंबडीचं रोज एक अंड लागतं. काजू, बदाम सकाळ-संध्याकाळी खाऊ घालावं लागतं. त्याला टाकीमध्ये थोडसं पोहायलाही लावं लागतं. त्यामुळे त्याचा दम, श्वास चांगला वाढतो”, असं सुल्तान कोंबड्याच्या मालकांने सांगितलं.