Maharashtra Accidents : शनिवार ठरला अपघात वार, 24 तासात 7 मोठे अपघात, 44 जणांचा मृत्यू; कुठे कुठे झाले अपघात?
राज्यात गेल्या 24 तासात सात भीषण अपघात झाले आहेत. या भीषण अपघातात आतापर्यंत 44 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात मोठा अपघात बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे झाला आहे. बुलढाण्यातील अपघातात एकूण 25 जणांचा मृत्यू झाला आहे.
बुलढाणा : महाराष्ट्रासाठी शनिवार हा अपघात वार ठरला आहे. एका दिवसात राज्यात 7 मोठे अपघात झाले. या अपघातात एकूण 44 जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या बुलढाण्या जिल्ह्यात सिंदखेडराजा येथेच झालेल्या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. बुलढाणा अपघातातील सर्व मृतांवर आज बुलढाण्यातच सामुहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. बुलढाणा अपघातातील चालक शेख दानिश इस्माईल शेख याला पोलिसांनी अटक केली असून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहे.
बुलढाण्यात 25 दगावले
बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथील पिंपळखुटा येथे समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात झाला. ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. बस एका खांबाला जाऊन धडकली. त्यानंतर बसचंनियंत्रण सुटलं आणि ही बस डिव्हायडरला जाऊन धडकली. बसल पलटली आणि बसच्या टँकचा स्फोट झाला आणि आग लागली. या आगीत 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर आठ जणांनी बसच्या खि़कीच्या काचा फोडून बाहेर उड्या मारल्याने ते बचावले आहेत. ही घटना काल मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास झाली. या अपघात प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात भादंवि कलम 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकी दोन लाख, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच लाख आणि कृषी मंत्री अब्दुल शेतकरी यांनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.
मलकापुरात चार ठार
बुलढाण्यातील मलकापूर येथेही सहा नंबर राष्ट्रीय महामार्गावर एक आयशर टेम्पो आणि बसची जोरदार धडक झाली. या अपघातात एका गर्भवती महिलेसह 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आठजण जखमी झाले असून त्यांच्यावर मलकापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही बस सूरतहून नागपूरला जात होती. त्यावेळी मलकापूर बायपास जवळ बसचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे टायरचे पंक्चर काढण्यासाठी बस बाजूला लावण्यात आली होती. त्यावेळी पाठून आलेल्या आयशर टेम्पोने बसला धडक दिली. या अपघातात आयशरच्या ड्रायव्हर आणि क्लिनरचा जागीच मृत्यू झाला.
समृद्धी महामार्गावर तिघे दगावले
शुक्रवारी सकाळी समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात झाला. नगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यात झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत. क्रुझर जीपमधून जात असताना पती, पत्नी आणि त्यांच्या दीड वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. जीपने आयशर टेम्पोला जोरदार धडक दिली. त्यात संतोष राठोड यांचा मृत्यू झाला. संतोहे जालना जिल्ह्यातील मंठा येथून लहान भावाच्या लग्नाला गेले होते. तिथून ते मुंबईला येत असताना हा अपघात झाला.
अक्कलकोटमध्ये सहा दगावले
सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये क्रुझर आणि टँकरची जोरदार धडक झाली. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. तर सातजण जखमी झाले आहेत. शुक्रवारी दुपारी 4 वाजता हा अपघात झाला. हे सर्व भाविक होते. देवदर्शनानंतर कर्नाटकातील आपल्या गावी परतत असताना हा अपघात झाला. जखमींना अक्कलकोट येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये चौघे दगावले
नाशिकच्या वणी-सातपुडा हायवेवर खोरीफाट्या येथे मारुती सियाज आणि क्रुझर दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर नऊ जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. हा अपघात काल संध्याकाळी 6 वाजता झाला.
महिलेचा मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर एका 65 वर्षाच्या महिलेचा ट्रक दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. कुंजीरवाडी ग्रामपंचायतीजवळच्या थेऊर फाट्याजवळ हा अपघात झाला. शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला. तसेच अकोटहून पुण्याकडे जाणाऱ्या बसला हनवाडी फाट्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 70 जण जखमी झाले. रस्त्यावर चिखल असल्याने बस स्लिप झाल्याने पलटल्याचं सांगण्यात आलं.
40 मजूर महिला जखमी
पिकअप व्हॅनने जात असताना गोंदिया येथे झालेल्या अपघातात 40 मजूर महिला जखमी झाल्या आहेत. काल हा अपघात झाला. डवकी ते कुक्किमेटा येथे बोरगावजवळ हा अपघात झाला. जखमी महिलांवर गोंदियाच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महिला ठार
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा विरदेल शिंदखेडा रोडवर शिंदखेडा शहारा लगत नायरा पेट्रोल पंप जवळ काल भीषण अपघात झाला. काल दुपारी दीड वाजता हा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर गाडीने समोरील विरुद्ध दिशेला जाऊन लक्ष्मण चौधरी यांच्या घराच्या पुढे पत्राच्या शेडमध्ये ही गाडी घुसली. या कारने पत्र्याच्या शेडमध्ये लावलेल्या स्वीफ्ट कार आणि बाईकला जोरदार धडक दिली. या धडकेत लक्ष्मण चौधरी किरकोळ जखमी झाले आहेत. तर एक महिला ठार झाली आहे. या अपघातात एक पोस्टमनही जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या पोस्टमनला लागलीच धुळे येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे.