बॅडमिंटन खेळता खेळता अचानक खाली कोसळला, रुग्णालयात नेलं पण तोपर्यंत उशिर झाला !
नेहमीप्रमाणे गुन्नू लोहारा हा व्यक्ती मित्रांसोबत बॅडमिंटन खेळायला गेला. मॅच सुरु असतानाच अचानक जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध झाला.
नागपूर : बॅडमिंटन खेळायला गेलेल्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. गुन्नू धर्मू लोहारा असे 49 वर्षीय मयत व्यक्तीचे नाव आहे. नागपुरमधील पाचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली. गुन्नू सोमवारी सकाळी आपल्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळायला गेला होता. मॅच सुरु असतानाच अचानक तो कोसळला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
मित्रांसोबतची ती मॅच अखेरची ठरली
नागपूरच्या यादव नगर परिसरात 47 वर्षीय गुन्नू आपल्या कुटुंबासह राहत होते. सोमवारी ते आपल्या मित्रांसोबत पाचपावली परिसरात बॅडमिंटन खेळायला गेले होते. मॅच खेळत असताना काही वेळाने ते अचानक खाली कोसळले आणि बेशुद्ध झाले. त्यांना तात्काळ सेंट्रल रेल्वे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज
गुन्नू यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नसले तरी हार्ट अटॅकमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण उघड होईल. पाचपावली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
हैदराबादमध्येही बॅडमिंटन खेळताना व्यक्तीचा मृत्यू
नुकतीच हैदराबादमध्येही अशीच एक घटना उघडकीस आली. बॅडमिंटन खेळताना 28 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. श्याम यादव असे मयत व्यक्तीचे नाव आहे. दररोज संध्याकाळी श्याम मित्रांसोबत बॅडमिंटन खेळायला जायचा. नेहमीप्रमाणे बॅडमिंटन खेळत असताना त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.