अब्दुल सत्तार विधानसभेत भावूक, विरोधकांचं सभागृहातून मौन? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
मविआ सरकारच्या काळात सत्तार महसूल राज्यमंत्री होते. त्यावेळी वाशिम मधल्या 37.19 एकर गायरान जमिनीचं अवैध वाटप केल्याचा आरोप आहे.
नागपूर : जमीन घोटाळ्याच्या आरोपात स्पष्टीकरण देताना मंत्री अब्दुल सत्तार भावूक झाले. कोर्ट जी शिक्षा देईल ती मान्य आहे. मात्र विरोधकांनी केलेले आरोप खोटे असल्याचं सत्तार म्हटले. विशेष म्हणजे दोन दिवसांपासून आक्रमक असलेले विरोधक आज सत्तारांच्या मुद्दयांवर मौन राहिल्याचं दिसलं. जमीनीसंदर्भात विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही मात्र कोर्ट जी शिक्षा देईल, ती मान्य असेल, असं मंत्री अब्दुल सत्तारांनी स्पष्ट केलं.
आरोपींची जी राळ उठली होती, त्यावर अब्दुल सत्तारांनी सभागृहात भूमिका स्पष्ट केली. स्पष्टीकरणावेळी सत्तार भावूकही झाले. यातलं वैशिष्ट्य म्हणजे दोन दिवसांपासून विरोधक जमीन घोटाळ्याच्या मुदद्यानं सत्तारांना टार्गेट करत होते. पण जेव्हा आज सत्तार यावर बोलणार हे स्पष्ट झालं, त्याआधीच विरोधकांनी सभात्याग केला आणि सत्तारांवरच्या आरोपांवर कमालीचं मौनही बाळगलं.
मविआ सरकारच्या काळात सत्तार महसूल राज्यमंत्री होते. त्यावेळी वाशिम मधल्या 37.19 एकर गायरान जमिनीचं अवैध वाटप केल्याचा आरोप आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार गायरान जमीन कोणत्याही खासगी व्यक्तीला विकता येत नाही. असं असताना मंत्रिपदाच्या दुरुपयोगानं सत्तारांनी जवळच्या व्यक्तीस 37.19 एकर गायरान जमीन दिली. आणि त्याद्वारे 150 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप अजित पवारांचा आहे.
दरम्यान टीईटी घोटाळ्यावरुन सभागृहातलं चित्र अनोखं होतं. टीईटीत परीक्षेत गलथानपणा आणि घोटाळ्याचे आरोप मविआ सरकारच्याच काळात झाले, ज्यात नंतर मंत्री अब्दुल सत्तार यांचंही नाव चर्चेत आलं होतं. मात्र विरोधकांनी आज टीईटीतल्या गैरव्यवहारावरुनच सभात्याग केला. नंतर भाजप आमदार संजय कुटेंनी हा मुद्दा उपस्थित करताच फडणवीसांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले.
कथित जमीन घोटाळ्यांच्या आरोपांवरुन विरोधकांनी सभागृहाबाहेर घोषणाही दिल्या. मात्र आतमध्ये जेव्हा सत्तारांनी स्पष्टीकरण दिलं, तेव्हा मात्र विरोधक सभात्याग करुन बाहेर पडले होते.