संघाच्या बौद्धिकाला शिंदे गटाची हजेरी, तर अजितदादा गटाची दांडी; प्रवीण दरेकर काय म्हणाले?
दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपचे आमदार आणि मंत्र्यांसाठी बौद्धिक वर्गाचं आयोजन केलं होतं. या बौद्धिक वर्गाला भाजपचे आमदार आणि मंत्री उपस्थित होते. शिंदे गटाचे आमदार आणि मंत्रीही पहिल्यांदाच या शिबिराला हजर राहिले. मात्र, अजितदादा गटाच्या आमदार आणि मंत्र्यांनी या बैठकीला पाठ फिरवली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजितदादा गटाच्या या भूमिकेवर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 19 डिसेंबर 2023 : नेहमीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांसाठी रेशीमबागेतील कार्यालयात बौद्धिकाचं आयोजन केलं होतं. या बौद्धिकाला भाजपचे मंत्री आणि आमदार उपस्थित होते. शिंदे गटाचे मंत्री आणि आमदारही उपस्थित होते. मात्र, अजितदादा गटाच्या एकाही मंत्र्याने किंवा आमदाराने या बौद्धिकाला हजेरी लावली नाही. विचारधारेच्या मुद्द्यावरून अजितदादा गटाने संघाच्या बौद्धिकाला पाठ फिरवली असल्याचं सांगितलं जात आहे.
संघाने रेशीमबागेत दरवर्षी प्रमाणे भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांसाठी बौद्धिकाचं आयोजन केलं होतं. या बौद्धिकाला भाजप आणि शिंदे गटाचे आमदार तसेच मंत्रीही हजर होते. शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री पहिल्यांदाच या बौद्धिकाला हजर होते. पण निमंत्रण असूनही अजितदादा गटाचा एकही आमदार संघाच्या बौद्धिकाला उपस्थित राहिला नाही. त्यामुळे विचारधारेच्याबाबत अजितदादा गट भाजपपासून अंतर राखूनच असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. तर, संघानं कुणालाही निमंत्रण पाठवलं नाही. भाजपचे आमदार इथे दरवर्षी येतात, असं संघाने स्पष्ट केलं आहे. यावेळी संघाचे विदर्भ सरसंघचालक श्रीधर घाडगे यांच्याकडून आमदारांना मार्गदर्शन करण्यात आलं.
संघस्थान आम्हाला वेगळं नाही
यापूर्वीही मी अनेक वेळेला संघ कार्यालयात आलेली आहे. या ठिकाणी येणं बौद्धिक प्राप्त करणं हे महत्त्वाचं आहे. अजित पवार गटाचे लोक का नाही आले याची मला माहिती नाही. मात्र शिंदे गटाचे जवळपास सर्वच लोक या ठिकाणी आले आहेत, संघस्थान आमच्यासाठी वेगळं नाही, असं शिंदे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी म्हटलंय.
लगेच काही बिघडलं नसतं
भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादा आणि त्यांच्या आमदारांनी इथे यायला हवं होतं. रेशीमबाग येथे आल्यावर लगेच काही बिघडलं नसतं. इथे येऊन विचारांची शिदोरी घेऊन जाता येते. इथे येऊन प्रेरणा मिळतेय. जातीच भेद होऊ नये हीच संघाची भूमिका आहे. यामुळे भाजपचं नुकसान होणार नाही. संघाचं बौद्धिक फायद्याचं आहे, असं भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.
अजितदादा गटाचं माहीत नाही
शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनीही यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. हेडगेवार यांनी केलेलं कार्य हे त्यांच्या स्थळावर आल्यानंतर आम्हाला पाहायला मिळालं. आतापर्यंत आम्ही त्यांचं नाव ऐकून होतो. त्यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झालाय हे पाहून बरं वाटलं. देशहितासाठी त्यांनी सूचना केल्या, असं भरत गोगावले म्हणाले. तसेच अजितदादा पत्र मिळाले की नाही माहिती नाही. आम्हाला पत्र मिळाले, आम्ही आलो. या आधी आम्ही कधी गेलो नाही. पण आम्हाला आज निमंत्रण मिळाला आम्ही आलो, असं गोगावले यांनी स्पष्ट केलं.