‘मी दुधखुळा नाही, विरोधी पक्षनेत्याचं काम मला कळतं’, शरद पवार यांच्याबद्दल ‘तो’ प्रश्न विचारल्यावर अजित पवार संतापले
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरुय. या चर्चेवर अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय.
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरुय. या चर्चेवर अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांच्या निलंबनावर अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर शरद पवार नाराज असल्याची चर्चा होती. या चर्चेबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला असता ते थेट पत्रकारांवरच भडकले. “विरोधी पक्षनेत्याचं काम मला जमतं. मी दुधखुळा नाही”, असं म्हणत अजित पवार संतापले.
“शरद पवार नाराज असल्याच्या चर्चा या धादांत खोटं आहे. तुम्हाला कुणी सांगितलं? शरद पवार यांनी फोन करुन सांगितलं? तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे. पण मी साहेबांच्या रोज संपर्कात असतो. आपल्या ज्ञानात अशी कुणी भर घातली?”, असा सवाल अजित पवार यांनी केला.
“तुम्हाला ब्रेकिंग न्यूज काही मिळत नाही. म्हणून अशाप्रकारच्या बातम्या पसरवता आणि लोकांच्या मनात समज-गैरसमज पसरवतात”, अशा शब्दांत त्यांनी माध्यमांवर रोष व्यक्त केला.
“मी विरोधी पक्षनेता म्हणून माझं काम कसं असावं ते मला कळतंय. मी काही दुधखुळा नाहीय. मी 32 वर्ष राजकारण, समाजकारणात प्रतिनिधित्व करणारा माणूस आहे”, असं अजित पवार म्हणाले.
“माझी काळजी करु नका. मला ज्या आमदारांनी विरोधी पक्षनेतेपद दिलंय त्यांना याबद्दल काय वाटतं ते आणि आम्ही बघू”, असंदेखील अजित पवार यावेळी म्हणाले.