नागपूर: महाविकास आघाडीच्या प्रयोगात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद दिलं. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे सर्वाधिक संख्याबळ असल्याने उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्याकाळात पडद्यामागे घडलेल्या घडामोडींवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतची वेगळीच माहिती दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आपण निवडून आलो. पक्ष मोठा असला तरी उद्धव ठाकरेंकडे मोठ मन दाखवत मुख्यमंत्रीपद दिलं होतं. कारण जनतेसाठी काम करायचं होतं, असा गौप्यस्फोट करतानाच आता विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे आहे. तरुणाची टीम आपल्याकडे आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं. नागपुरात कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी हे भाष्य केलं. त्यामुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.
शरद पवार साहेब म्हणतात, आपल्याला सीनियर नेते तर पाहिजेच. पण तरुण रक्त शुद्ध पाहिजे. प्रामाणिक असणारा कार्यकर्ता पाहिजे. त्याची निवड योग्य झाली पाहिजे. मोठा हार घालणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा निष्ठावान कार्यकर्ता पाहिजे. कार्यकर्ते कमी असतील तरी चालेल पण निष्ठावान पाहिजे, असं सांगतानाच ग्रामपंचायतीत आपण मोठं यश मिळविल्याचंही सांगितलं.
कोणत्या भागातून किती कार्यकर्ते आले? असा सवाल करत अजितदादांनी त्यांना हातवर करायला लावले. कार्यकर्ता अलर्ट असायला पाहिजे. मजबूत असायला पाहिजे. आम्ही सुद्धा नवीन कार्यकर्ते होतो. आता सीनियर झालो. तुम्हाला पण वाढायचं आहे, असं ते म्हणाले.
विदर्भात राष्ट्रवादीची ताकद वाढायला पाहिजे तेवढी ताकत वाढली नाही. आपण प्रयत्न केला तर आपली ताकत वाढते. आम्ही इथे मंत्री, खासदार दिले. मोठी ताकत दिली. अनिल देशमुख गृहमंत्री झाले. नवीन कार्यकर्त्यांनी आपल्या भागात नियमित काम करायला पाहिजे. लोकांच्या समस्यांसाठी धावून जायला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
आमच्या परिसरात आम्ही अनेक आमदार निवडून आणले. आपला पक्ष सर्व धर्माला घेऊन चालणारा पक्ष आहे. काही राजकीय पक्ष जातीच्या नावाने राजकारण करतात. आपण ते करत नाही. कारण सगळ्यांच रक्त लाल आहे, असंही ते म्हणाले.
आम्ही ज्याप्रमाणे काम करतो, त्याप्रमाणे तुम्ही काम करा. आम्ही लाखाच्या मताने निवडून येतो. कारण आमच्या मागे कार्यकर्ता असतो. संघटनेप्रमाणे बांधणी करायला पाहिजे. आघाडीमध्ये मित्र पक्षांसोबत लढावं लागतं. आम्ही कुठली जागा घ्यायची त्याचा विचार करू, अशी माहिती त्यांनी दिली.
आपण विदर्भ ढवळून काढू. इथे पोटँशियल आहे. त्यामुळे तुम्ही पदाच्या मागे धावू नका. आपण विदर्भात मोठा विजय मिळवू. 16 आमदारांचा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे. त्याचा निकाल आल्यावर काय चित्र असेल ते पाहा.
अनिल देशमुख कालच बाहेर येतील असं वाटत होतं असं सांगतानाच विरोधक काय करत आहे हे सगळ्यांना माहीत आहे. सत्ताधाऱ्यांना सत्तेची धुंदी चढली आहे. पण जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल, असा इशाराही त्यांनी दिला.