महाविकास आघाडीच्या मोर्चात पैसे घेऊन लोकं आले? अजित पवार म्हणतात…..
महाविकास आघाडीचा मोर्चा अयशस्वी झाला असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाचा नॅनो मोर्चा असा उल्लेख करत खिल्ली उडवली. पण त्यांच्या या टीकेला विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडूनही उत्तर देण्यात आलंय.
नागपूर : महाविकास आघाडीचा मोर्चा अयशस्वी झाला असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाचा ‘नॅनो मोर्चा’ असा उल्लेख करत खिल्ली उडवली. पण त्यांच्या या टीकेला विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडूनही उत्तर देण्यात आलंय. देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाला आम्ही फार महत्त्व देत नाही, असं खोचक उत्तर अजित पवारांनी दिलंय. या मोर्चात सहभागी होण्यासाठी आंदोलकांना पैसे देण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. त्यावरही अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं.
“माझ्या माहितीप्रमाणे मोर्चामध्ये तसं काही झालेलं नाही. कारण मी त्या मोर्चात सुरुवात ते शेवटपर्यंत होतो. मोर्चा संपला त्याहीवेळेस मी काही काळ लोकांसमवेत बोलत होतो”, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
“पैसे घेऊन मोर्चात आलेले अशा प्रकारचे कुठलेही लोकं आम्हाला दिसलेले नाहीत. कारण नसताना बदनामी करण्याचं काम नाही. उपमुख्यमंत्र्यांनी नॅनो नाव ठेवावं की स्कुटर नाव ठेवावं, तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्या गोष्टीला फार महत्त्व देत नाही”, असं अजित पवारांनी उत्तर दिलं.
“मुंबईत आम्ही आज जसा एकत्र मिळून महामोर्चा काढला, तसंच या अधिवेशनात एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारच्या चुकलेल्या गोष्टींवर आवाज उठवण्याचं काम करु”, असं अजित पवारांनी सांगितलं.
“आमच्या आघाडीची पहिलीच बैठक साधारण सोमवारी घेण्याचा प्लॅन आहे. त्यावेळेस उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, छगन भुजबळ, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे सगळे उपस्थित राहतील असा आमचा प्रयत्न आहेत”, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी अजित पवार यांना राज्य सरकारच्या चहापानच्या कार्यक्रमात सहभागी होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी याबाबत चर्चा करुन निर्णय घेऊ, असं उत्तर दिलं.
“आम्ही महामोर्चाच्या तयारीत होतो. मुख्यमंत्र्यांनी मला, अंबादास दानवे आणि इतर प्रमुखांनाही पत्र पाठवलं आहे. आम्ही आजपर्यंत सगळे हल्लाबोल आंदोलनाच्या तयारीत होतो. त्यामुळे उद्या आम्ही एकत्र बसून चहापानच्या कार्यक्रमाला जायचं का याबाबत निर्णय घेऊ”, असं त्यांनी सांगितलं.
“उद्या दोन्ही विरोधीपक्ष आणि इतर सहकाऱ्यांच्या समवेत उद्या दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद ठेवली आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.
“राज्यपालांच्या अभिभाषणात सीमाप्रश्नाचा मुद्दा असतो. हा मुद्दा केंद्र सरकारपर्यंत पोहोचला. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बैठकीत कोण काय बोललं याबद्दल सविस्तर माहिती समोर आलेली नाही. पण बेळगाव, कारवार, निपाणीसह इतर प्रदेश महाराष्ट्रात आले पाहिजेत. याबाबत जे निर्णय होईतील अशा बाबतीत आमचा सकारात्मक दृष्टीकोन राहील. विरोधाला विरोध करणार नाहीत. पण महत्त्वाच्या ठिकाणी आवाज उठवण्याचं आम्ही काम करु”, असं अजित पवार म्हणाले.