मोठी बातमी! संसदेच्या हिवाळी अधिवेशनानंतर शिंदे गटाचे खासदार नागपुरात येणार, पडद्यामागे नेमकं काय सुरुय?
विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन प्रचंड गाजत असताना नागपुरातून आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. शिंदे गटाचे खासदार दिल्लीतून नागपुरात दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे.
संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : नागपुरात सध्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरुय. या अधिवेशनाचे आतापर्यंत तीन दिवस पूर्ण झाले आहेत. अधिवेशनाचे तीनही दिवस प्रचंड गाजले. विरोधकांनी गेल्या दोन दिवसांपासून विविध मुद्द्यांवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आलं. त्यामुळे सभागृहात आणखी गोंधळ उडाला. या सगळ्या घडामोडींमुळे हिवाळी अधिवेशन प्रचंड गाजत असताना नागपुरातून आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. शिंदे गटाचे खासदार दिल्लीतून नागपुरात दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे.
संसदेचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरुय. हे अधिवेशन उद्या संपणार आहे. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार नागपुरात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीमावादावरुन प्रकरण चांगलंच गाजतंय. सीमावादाच्या मुद्द्यावरुन दिल्लीतही बैठकांचे अनेक सत्र पार पडले आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर कदाचित चर्चा करण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार नागपुरात येत असल्याची चर्चा आहेत.
याशिवाय राज्यात सध्या सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणावरुन राजकारण चांगलंच गाजत आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी तर या प्रकरणावरुन लोकसभेत थेट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करत गंभीर आरोप केला. विशेष म्हणजे हेच प्रकरण आज विधानसभेतही गाजलं. याच प्रकरणी ठाकरे गटाला घेरण्यासाठी रणनीती आखण्याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक असण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अजून बाकी आहे. या विस्तारासाठी आणि नव्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या निमित्ताने तरी शिंदे गटाचे खासदार नागपुरात येत नाहीय ना? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरुय. पण अर्थात याबाबत कोणतीही अधिकृत अशी माहिती समोर आलेली नाही. याशिवाय कुणाकडूनही या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही.
शिंदे गटाचे खासदार नेमकं का नागपुरात येत आहेत? याबाबत अधिकृत अशी कोणतीही माहिती समजू शकलेली नाहीय. पण खासदारांच्या नागपूर दौऱ्यावरुन राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय.