शिंदे सरकारमधील आणखी एका मंत्र्याबाबत उद्या गौप्यस्फोट होणार? महत्त्वाची माहिती आली समोर
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची माहिती समोर येतेय. शिंदे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला उद्या विरोधी पक्ष घेरण्याची शक्यता आहे.
प्रदीप कापसे, नागूपर : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची माहिती समोर येतेय. शिंदे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला उद्या विरोधी पक्ष घेरण्याची शक्यता आहे. संबंधित मंत्र्यावर उद्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात येतील. विरोधी पक्षनेते याबाबत कदाचित पुरावे देखील सभागृहात सादर करु शकतील. कारण विरोधी पक्षाकडून एका मंत्र्याला घेरण्याचा प्लॅन आखण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना याबाबतचा स्पष्ट उल्लेख केलाय.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून राज्य सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप केले जात आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज तीन मंत्र्यांचा उल्लेख केला.
विरोधकांकडून आज कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. अब्दुल सत्तार यांनी 150 कोटींची 37 एकर गायरान जमीन हडप केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय.
विशेष म्हणजे शिंदे सरकारमधील आणखी 3 मंत्र्यांनी गायरान जमीन विकल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. पण आपण पुरावा गोळा करत असल्याने त्यांची नावं घेत नाहीत, असं अजित पवारांनी सभागृहात सांगितलं.
विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही भूखंड घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय. विशेष म्हणजे विरोधक उद्या सभागृहात शिंदे सरकारमधील आणखी एका मंत्र्याबाबत मोठं विधान करण्याची दाट शक्यता आहे. कारण अंबादास दानवे यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलंय.
अंबादास दानवे यांनी नेमकं काय सांगितलं?
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महत्त्वाची माहिती दिलीय. “उद्या आणखी एका मंत्र्यांचा बॉम्ब फुटणार. यामध्येही मंत्रीच आहेत”, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिलाय.
“सत्ताधारी घाबरले आहेत. विरोधी पक्ष नवीन रोज काहीतरी मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढेल ही भीती त्यांना आहे. त्यामुळे अध्यक्ष बोलू देत नाहीत”, असा दावा अंबादास दानवे यांनी केला.
“मंत्र्यांवरील आरोपांप्रकरणी मंत्री शंभूराजे देसाई म्हणतायेत तर करा चौकशी”, असं आव्हान त्यांनी दिलंय.
अजित पवार तीन मंत्र्यांबद्दल नेमकं काय म्हणाले आहेत?
अजित पवार यांनी गायरान जमीन घोटाळ्याबाबत महाराष्ट्र सरकारमधील तीन मंत्र्यांवर आरोप केले आहेत. पण त्यांच्या नावांचा उल्लेख केलेला नाही.
“गायरान जमीन घोटाळ्यात सरकारमधील तीनेक मंत्री सहभागी आहेत. याविषयीचे कागदपत्र, पुरावे आम्ही जमा करत आहोत. सबळ पुरावे मिळताच या मंत्र्यांची नावे जाहीर करू. तसेच, विधानसभेतही हा मुद्दा मांडू”, असं अजित पवार म्हणाले.
“ज काही स्थानिक वृत्तपत्रांत गायरान जमीन घोटाळ्यात आणखी काही मंत्र्यांचा सहभाग असल्याचे छापून आले आहे. हे सर्व प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणावर हायकोर्टानेही शिंदे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. फक्त पुराव्यांशिवाय आम्हीही केलेले आरोप म्हणजे फुसका बार ठरू नये, असे वाटते. त्यामुळेच संपूर्ण माहिती घेतल्यानंतर याविषयी सविस्तर माहिती देऊ”, असं अजित पवारांनी आज पत्रकारांशी संवाद सांगताना सांगितलं होतं.