Milk Production | दुग्धोत्पादन वाढवाचंय, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदारांनी सांगितली युक्ती!
विदर्भात दुग्धोत्पादन वाढवायचं असेल, तर गीर गायीकडं आपल्याला पुन्हा वळावं लागेल. गीर गाय ही भरपूर दूध देणारी गाय आहे. आपली देशी गाय परदेशात गेली. तिथं भरपूर दुग्धोत्पादन होते. आपण, त्यात मागे पडता कामा नये, असं सुनील केदार म्हणाले.
नागपूर : बॉटल बंद पिण्याचे पाणी महाग आणि दूध स्वस्त अशी परिस्थिती राहिल्यास दूध उत्पादनाला बरकत कशी येईल? दुग्ध व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळाले तर आपोआप शेतकऱ्यांचा या व्यवसायाकडे कल वाढेल. त्यामुळं दुधाला चांगला दर मिळण्यासाठी बाजारपेठेत दुधाची मागणी वाढणे आवश्यक आहे. याकरिता राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ व मदर डेअरीच्या माध्यमातून प्रयत्न करावेत, अशा सूचना राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी नागपुरात केली.
नागपूर शहरांमध्ये ॲग्रोव्हिजन 2021 या कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी यामध्ये विदर्भात दुग्ध व्यवसायाच्या संधी यासंदर्भात एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सुनील केदार बोलत होते.
गावागावांतून दुग्ध संकलन व्हावे
नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एक दिवसीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. श्री. गडकरी म्हणाले, विदर्भात दुग्ध व्यवसाय वाढीसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ, मदर डेअरी आणि राज्य शासनाच्या सहकार्याने प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमाला अधिक गती देवून प्रत्येक गावामध्ये मदर डेअरीच्या माध्यमातून दूध संकलन सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. आगामी काळात विदर्भात दुग्ध क्रांती घडविण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ, मदर डेअरी यांनी अधिक प्रभावीपणे कार्यवाही करावी, अशा सूचना श्री. गडकरी यांनी यावेळी केल्या.
व्यवसायाची सांगड मागणीशी घालावी
सुनील केदार यांनी मार्गदर्शन करताना ऍग्रो व्हिजनसारख्या मोठ्या आयोजनात नितीन गडकरी यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. पशुसंवर्धन मंत्री म्हणून दुग्धव्यवसायात वाढ करण्याबाबत राज्य स्तरावर आपले प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र देशामध्ये दुधाची भुकटी तयार करणारा मोठा प्रदेश आहे. दुग्ध व्यवसाय आता हा स्थानिक व्यवसाय न राहता जागतिक व्यवसाय झाला आहे. नवनव्या तंत्रज्ञानामुळे अनेक मोठ-मोठ्या उद्योग कंपन्या या व्यवसायाचे नेतृत्व करत आहेत. विदर्भामध्ये दुग्ध व्यवसाय वाढावा, यासाठी मदर डेअरीमार्फत सुरू असलेल्या प्रयत्नात आम्ही देखील सहभागी आहोत. मात्र दुग्ध व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यासाठी या व्यवसायाची सांगड बाजार आणि वाढत्या मागणीशी घालावी लागेल.
दुग्धजन्य पदार्थांचा वापर वाढावा
शेती उद्योगाशी संबंधित असल्यामुळे अनेक वेळा दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसोबत थेट संबंध येतो. बाटलीबंद पिण्याच्या पाण्याला अधिक भाव आणि दुधाला कमी भाव, अशी टिप्पणी ज्यावेळी शेतकऱ्यांकडून येते. त्यावेळी त्यांना या व्यवसायात आणखी गती घ्यावी, असे कसे म्हणता येईल प्रश्न पडतो. त्यामुळे दुधाला उत्तम भाव मिळाले पाहिजे. घराघरात दुग्धजन्य पदार्थाचा वापर वाढला पाहिजे. यासाठी काही उपाय योजना करणे आवश्यक आहे. व्यवसाय म्हणून चार पैसे पदरात पडायला लागल्या नंतर त्या व्यवसायाला निश्चितच बरकत येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.