Ashish Jaiswal : मंत्र्यांना आर्थिक मोबदला दिल्यानंतरच निधी मिळतो, आशिष जैस्वालांचा नागपुरात गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार
काही मंत्री आमदारांना टक्केवारी मागतात. याबाबत आज मुख्यमंत्र्यांना तक्रार करणार आहे. आमदार आहेत म्हणून सरकार आणि मंत्री आहेत. निधीवाटपाबाबत नाराजी कायम आहे, असे आमदार आशिष जैस्वाल म्हणाले आहेत.
नागपूर : मंत्र्यांना आर्थिक मोबदला दिल्यानंतरच निधी दिला जातो, असा गंभीर आरोप आमदार आशिष जैस्वाल (Ashish Jaiswal) यांनी केला आहे. ते नागपुरात बोलत होते. निधीवाटपावरून त्यांची नाराजी असून मंत्री टक्केवारी मागतात, असा आरोप त्यांनी केला आहे. याविषयीची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. निधीवाटपावरून नेहमीच अन्याय होत आहे. हा असमतोल कधीही सहन करणार नाही. आम्हाला न्याय मिळाला नाही मिळाला हा विषय नाही. मात्र मतदारसंघाला न्याय मिळायला हवा. निधीवाटपावरूनची नाराजी कायम आहे. जोपर्यंत त्या नाराजीवर योग्य ट्रिटमेंट मिळत नाही, योग्य ती कृती होत नाही, तोवर नाराजी दूर होणार नाही, असेही यावेळी आशिष जैस्वाल म्हणाले आहेत. निधीवाटपासंदर्भातील(Allocation of funds) टक्केवारीवरूनही त्यांनी मंत्र्यांवर टीका केली आहे.
राज्यसभा निवडणुकीत आ. आशिष जैस्वाल कुणाच्या बाजूने?
महाविकास आघाडीला पाठिंबा देणारा मी पहिला आमदार आहे, असे ते म्हणाले. मात्र स्पष्ट सांगितले नसले तरी महाविकास आघाडीने ठरवून दिलेल्या उमेदवारालाच पाठिंबा देण्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहेत. तसेच मतदारसंघातील प्रश्नही महत्त्वाचे आहेत, असे ते म्हणाले.
काय म्हणाले आशिष जैस्वाल?
राज्य सरकारला इशारे
आशिष जैस्वाल यांनी राज्य सरकारला इशारे दिले आहेत. पाहू या नेमके काय म्हटले आहे. एकूण सहा इशारे त्यांनी सरकारला दिले आहेत.
1. काही मंत्री आमदारांना टक्केवारी मागतात. याबाबत आज मुख्यमंत्र्यांना तक्रार करणार आहे. आमदार आहेत म्हणून सरकार आणि मंत्री आहेत. निधीवाटपाबाबत नाराजी कायम आहे.
2. आमदार या सरकारच्या विरोधात जाऊ शकतात, असा इशारा त्यांनी दिला आहे. मतदारसंघाला न्याय मिळायला पाहिजे. निधीचा असमतोल आम्ही कधीही सहन करणार नाही. मंत्र्यांना आर्थिक मोबदला दिल्यावरच निधी दिला जातो. मतदारसंघ आधी, मग पार्टी आणि नंतर महाविकास आघाडी आमच्यासाठी महत्त्वाची आहे. पक्षाच्या तिकीटवर निवडणूक आलेल्या आमदारांनीही आधी मतदारसंघ महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवावे, असे ते म्हणाले.
3. मतदारसंघाला वाऱ्यावर सोडून सरकारपुढे कोणी फरफटत जाऊ शकत नाही. आमच्या तक्रारीवर मुख्यमंत्री योग्य ते निराकरण करतील. याचा या निवडणुकीवर परिणाम होईल, असे आता म्हणता येणार नाही.
4. आमदारांच्या अडचणी दूर झाल्या नाही, तर त्याचे दुष्परfणाम सरकारला भोगावे लागतील.
5. काही मंत्री आमदारांना वाऱ्यावर सोडत असेल, अन्याय करत असाल तर आम्ही सहन करणार नाही. हे आमदार सरकारविरोधातही जाऊ शकतात.
6. आमदार आहेत म्हणून मंत्री आहेत. आमदारांना चुकीची वागणूक दिली तर आमदारांचा उद्रेक होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने आम्ही बैठकीला जात आहोत. अजिबात घोडेबाजार होणार नाही. हिंमत असेल तर कुणी आम्हाला ऑफर देऊन बघावे. आम्ही मुक्कामाच्या तयारीने जात आहोत, असे आशिष जैस्वाल म्हणाले.