चोरटे एटीएम मशीन कापायला गेले, तेवढ्यात धूर निघाला; त्यानंतर चोरट्यांनी ठोकली धूम
पोलिसांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मागवले. रात्री दोन वाजता एक आरोपी दुचाकी वाहनाने एटीएमजवळ आला. काही वेळानंतर दुचाकी वाहनाने आणखी दोन आरोपी तेथे आले.
नागपूर : जरीपटक्याच्या जिंजर मॉल रोडवर कॅनरा बँकेचे एटीएम आहे. गुरुवारी सकाळी नागरिकांना एटीएम मशीन तुटलेले दिसले. काही भाग जळाला असल्याचे दिसले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहचले. फिंगट प्रिंट विभाग आणि श्वान पथकाला बोलावण्यात आले. पोलिसांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मागवले. बुधवारी रात्री दोन वाजता एक आरोपी दुचाकी वाहनाने एटीएमजवळ आला. काही वेळानंतर दुचाकी वाहनाने आणखी दोन आरोपी तेथे आले. त्यांच्याजवळ गॅस कटर आणि सिलेंडर होता. दोन आरोपी गॅस कटर घेऊन आतमध्ये गेले. तिसरा आरोपी बाहेर पहारा देत होता.
गॅस कटरने एटीएम कापण्याचा प्रयत्न
नागपुरात जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत गॅस कटरने एटीएम कापण्याचा प्रयत्न करताना आग लागली. त्यामुळे चोरटे पसार झाल्याची घटना घडली आहे. जिंजर मॉल जवळील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये ही घटना घडली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली. चोरीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला.
मशीनमधून निघू लागला धूर
गुरुवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास दोन चोरटे एटीएममध्ये घुसले. एक बाहेर उभा होता. दोघांनी गॅस कटरने मशीन कापायला सुरुवात केली. अचानक आग लागली. एटीएममध्ये धूर पसरला. घाबरून चोरट्यांनी गॅस कटर तेथे सोडले आणि पोबारा केला. ही माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणात चोरीचा गुन्हा दाखल केला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
फुटेज पाहून आरोपींचा शोध सुरू
एटीएम मशीनमध्ये नुकतीच रक्कम टाकली होती. २१ लाख रुपये कॅश टाकली होती. याचा अर्थ आरोपी एटीएमवर नजर ठेवून होते. पण, या परिसरात एकही पोलीस गस्तीवर नव्हता. पोलीस फुटेज पाहून आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. चोरट्यांनी जरीपटका बाजार परिसरातील एटीएम फोडण्याची योजना बनवली. पण, ते त्यात यशस्वी होऊ शकले नाहीत. आता पोलीस त्यांचा शोध कसा घेतात, हे लवकरचं समजेल.