Nagpur | संरक्षण दल प्रमुखांचा मृत्यू दुर्दैवी, सत्ताधाऱ्यांनी अपघाताची माहिती द्यावी; विजय वडेट्टीवार यांचं मत
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचा १४ डिसेंबरला गडचिरोली दौरा राजकीय नाही. आदिवासी मुलींना सायकल वाटप करण्याचा कार्यक्रम आहे. सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी प्रियंका गांधी येत आहेत, अशी माहितीही वडेट्टीवार यांनी दिली.
नागपूर : देशाच्या लष्कराच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या व्यक्तीचा मृत्यू होणं ही दुःखाची बाब आहे. या अपघाताबाबत संजय राऊत यांनी घेतलेली शंका अनेकांच्या मनात आहेत. संजय राऊत यांच्या मनातील शंकेचं निरसण व्हावं, असं मत मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलंय.
विजय वडेट्टीवार म्हणाले, संरक्षण दलप्रमुख बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. मृतांमध्ये त्यांनी पत्नी आणि बारा लष्करी अधिकारी होते. नेमका हा अपघात कसा घडला याची माहिती देशाला कळावी. सत्ताधाऱ्यांनी या अपघाताची माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रशासन सज्ज
वडेट्टीवार म्हणाले, कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही काही सांगता येत नाही. पण, आपण सतर्क रहायला हवं. हे हवामान खात्यासारखं नाही उद्याच येईल असं. पण तिसरी लाट आली तर आपली तयारी आहे. प्रशासन कामाला लागलं आहे. ठिकठिकाण ऑक्सिजन प्लांटची संख्या वाढविण्यात आली. गरज पडल्यास ऑक्सिजन कमी पडणार नाही, याची व्यवस्था करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
ओमिक्रॉनला घाबरू नका, काळजी घ्या
ओमिक्रॅानच्या बाबतीत काही नागरिक खूप घाबरलेले दिसतात. पण, घाबरून जाण्याचं कारण नाही. आजच राज्यातला ओमिक्रॅानचा पहिला रुग्ण बरा झालाय. तो सुखरूप घरी परतला. त्यामुळं इतर रुग्णही यातून बरे होतील. भीतीचं वातावरण तयार केलं जातंय. अशी काही स्थिती नाही. पण काळजी घेण्याची गरज आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले.
कुठलेही निर्बंध लावण्याची तयारी नाही
सध्यातरी कुठलेही निर्बंध लावण्याची तयारी नाही. राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. देशात कोरोनाचा दर आता कमी होत आलाय. देशात ॲक्टिव्ह रुग्ण कमी आहेत. ओमिक्रॅानची फार चिंता करण्याची गरज नाही. पण कोरोनाचे नियम पाळणं गरजेचं आहे, असा सल्ला वडेट्टीवार यांनी दिलाय.
घटनादुरुस्ती करून ओबीसींचे आरक्षण ठेवावे
ओबीसी आरक्षण जाण्यास भाजप जबाबदार आहे. जोपर्यंत केंद्र सरकार याबाबत अमेंडमेंट आणत नाही. तोपर्यंत भाजप टोलवाटोलवी करतो, असंच म्हणावं लागेल. घटनादुरुस्ती करुन केंद्र सरकारनं ओबीसींचं २७ टक्के आरक्षण क्लिअर करावं आणि विषय संपवावा. भाजपनं ढोंगीपणा करुन लोकांमध्ये संभ्रम तयार करु नये.
प्रियंका गांधी १४ ला गडचिरोलीत
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचा १४ डिसेंबरला गडचिरोली दौरा राजकीय नाही. आदिवासी मुलींना सायकल वाटप करण्याचा कार्यक्रम आहे. सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी प्रियंका गांधी येत आहेत, अशी माहितीही वडेट्टीवार यांनी दिली.