अमरावती : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चांवर चर्चा सुरू आहेत. बैठकांवर बैठका सुरू आहेत. कुणाला कोणती खाती मिळणार? कुणाला कोणतं मंत्रीपद मिळणार? अजित पवार हे युतीत आल्यानंतर शिंदे गटाच्या वाट्याला आता किती मंत्रीपदं येणार या सर्व गोष्टी गुलदस्त्यात आहेत. याबाबतचे फक्त तर्कवितर्क लढवले जात असून ठोस काहीही माहिती मिळत नाहीये. पण मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेमकं काय होऊ शकतं? याचा अंदाज माजी मंत्री, आमदार बच्चू कडू यांनी वर्तवला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
अजित पवार गट युतीत आल्यावर नाराजी होणारच. ही मंत्रीपदं आहेत. साधीसुधी गोष्ट नाही. कोण कशावरून नाराज होईल सांगता येत नाही. आपल्याच पद मिळावं ही प्रत्येकाची अपेक्षा असते. कोणीच आनंदी नसतो. विरोधी पक्षातील लोकही आनंदी नसतात आणि सत्ताधारीही नसतो. सुखी माणसाचा सदरा वगैरे असं आलं नाही अजून, असं बच्चू कडू म्हणाले.
बैठकीतून अनेक गोष्टी येत आहे. कुणाला कोणतं खातं द्यायचं, पालकमंत्रीपद कुणाला करायचं याची चर्चा सुरू आहे. हे दिसायला खूप सोपं वाटतं. पण आतमध्ये पोखरलेलं असतं कधीकधी, असं सांगतानाच मला कोणत्याही पालकमंत्रीपदाची अपेक्षा नाही. जे आलं ते घेऊन जात असतो. मंत्रिपदाबाबत अद्याप कुणाचा फोन आलेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. कधी मंत्रिमंडळ विस्ताराचं माहीत नाही. खाते वाटपाचा गोंधळ सुरू आहे असं वाटतं. तीन इंजिन आहे. हे इंजिन मजबूत होऊ शकते किंवा बिघाडही होऊ शकतो. बिघाडी होऊ नये म्हणून बैठका सुरू असतील, असं ते म्हणाले.
मला शिंदे गटातील चार पाच आमदार भेटले. अजित पवारांकडे अर्थखातं गेलं तर अजितदादा पुन्हा तेच करतील. राष्ट्रवादीला अधिक निधी देतील. इतरांना कमी देतील. हा भेदभाव सुरूच राहील. त्यामुळे अजित पवार यांना अर्थखातं द्यायला सर्वांचा विरोध आहे. अजित पवार यांना अर्थखातं देऊ नये अशीच सर्वांची भावना आहे, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
आमदारांची नाराजी दूर करणे ही तारेवरची कसरत आहे. नाराजीचा सूर काय निघेल हे सांगता येत नाही. आमदारांना खूप अपेक्षा आहेत. तिसरा गट आल्याने शिंदे गटाची मंत्रिपदं कमी झाली आहेत. काही मंत्रिपद इतरांना दिली जाणार आहेत. घासातला घास गेला. आपला नंबर कापला गेला. त्यामुळे शिंदे गटात मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी वाढेल, असा दावा त्यांनी केला आहे.
तिन्ही नेत्यांनी व्यवस्थित सरकार चालवलं आहे. लोकांची मन जिंकणं सरकारचं काम असतं. अनैसर्गिक युती केली असल्याचं लोक म्हणत आहे. पण एखादा गुंड असेल आणि त्याने कुणाचा जीव वाचवला तर त्याचंही कौतुक होतं. तसेच तीन गटांना चांगली कामे केली तर लोक त्यांचंही कौतुक करतील, असंही ते म्हणाले.