गुवाहाटीला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना फोन केला, पण त्यांची मानसिकता… बच्चू कडू यांचा मोठा गौप्यस्फोट काय?
लहान मुलांना विचारलं तरी तेही हेच सांगतील की नवनीत राणा पडतील. रवी राणाच त्यांना पाडणार आहेत. त्यांच्याच प्रवृत्तीने पडणार आहेत. हे सांगण्याची गरज नाही. रवी राणाने दोन वर्ष तोंड गप्प ठेवलं असतं तर निकाल वेगळा लागला असता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं. शिवसेनेच्या आणि अपक्ष मिळून 50 आमदारांना घेऊन ते गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी नेमकं काय झालं होतं? कोण कुणाला विचारून गेले? हे बंड कसं झालं? त्यावेळची परिस्थिती काय होती? याची अधूनमधून माहिती येत असते. त्यामुळे गुवाहाटी बंडाच्यावेळी नेमकं काय झालं होतं? याचा अंदाजही येतो. आता याच बंडाबाबत प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते बच्चू कडू यांनी भाष्य केलं होतं. गुवाहाटीला जाण्यापूर्वी आपण तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला होता, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना बंडाची पुरेशी कल्पना होती अशी चर्चा रंगली आहे.
बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधताना या बंडाविषयी भाष्य केलं आहे. गुवाहाटीला जाताना उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. तेव्हा त्यांची बोलण्याची मानसिकता नव्हती. कारण बरेच आमदार गुवाहाटीला गेले होते. मला वाटलं आपण जाताना एक फोन केला पाहिजे. त्यांनी फोन केला. त्यांनी फोन उचलला. बोलले सुद्धा. पण बंडावर ते काही बोलू शकले नाही. त्यानंतर मी फोन ठेवून दिला, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
एक गोष्ट कॉमन होती…
उद्धव ठाकरेंशी तुमचे संबंध कसे आहेत? असा सवाल बच्चू कडू यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांच्याशी आमचं काही भांडणं नाही. राजकीय भांडणं नाही. राजकारणात पाच वर्षात पाहिलं तर एक कॉमन गोष्ट पाहिली, ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सर्वांच्या बॅनरवर होता. काँग्रेसच्या बॅनरवरही होता आणि राष्ट्रवादीच्याही बॅनरवर होता. राजकारणात कोणी कुणाचा दुश्मन नसतो. सगा सोयरा नसतो. हे कित्येक काळापासून चालत आलं आहे. शिवाजी महाराजांचा काळ असो की रामायण आणि महाभारतही पाहा. राजकारण जनतेने मनावर घेऊ नये. त्यांनी मतदानावेळी कोण आपल्यासाठी काम करतं हे पाहिलं पाहिजे. कोण कुठे बसलं हे पाहू नये, असं बच्चू कडू म्हणाले.
चार तारीख आमचीच
यावेळी त्यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर जोरदार टीका केली. एकट्या राणांमुळेच आम्ही उभं राहिलो असं नाही. रंगपंचमीच्या वेळी आम्ही भिंती रंगवल्या होत्या. निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला, असं आम्ही भिंतीवर लिहिलं होतं. तेही आम्हाला मांडायचं होतं. एकंदरीत अमरावती जिल्ह्यात आमची काय ताकद आहे? आम्ही कशी बाजू पलटवू शकतो हे निकाल पेटीतून दिसेल. आज जरी सट्टा बाजारात त्यांना भाव असला तरी निकाल मात्र आमच्याच बाजूने लागेल याची आम्हाला खात्री आहे. सट्ट्याचे बाजार भाव हे मतपेटीतील नाही. 4 तारीख आमचीच असेल, असा दावा त्यांनी केला.
आम्ही जिंकलोय
भाव कुणाचे असले तरी निवडणूक आम्ही जिंकली आहे. आम्ही मुद्दे घेऊन लोकांकडे गेलो. महाराष्ट्रात शेतकरी, मजूर आणि कामगारांचे हाल होत आहेत. आम्ही त्यांचे मुद्दे जनतेपर्यंत नेले. ही निवडणूक आम्ही जिंकलेलो आहोत. पण टेक्निकल काय निकाल लागतो हे माहीत नाही. सट्टाबाजारात कुणाचा तरी भाव असला तरी आम्ही आमची मांडणी केली. आमचा जो उद्देश होता तो सफल झाला. निवडणुकीत धर्मजातीचा मुद्दा असताना आम्ही शेतकरी आणि कामगारांचे मुद्दे लोकांपर्यंत नेले. प्रभावीपणे मांडले. त्यात आम्ही जिंकलो आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.