अमरावती : वर्ष होऊन गेलं तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपचे आमदार मंत्रिपदाची आस लावून आहेत. दुसरीकडे आठ दिवस उलटूनही राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्र्यांसह नऊ मंत्र्यांना खाते देण्यात आलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीतही अस्वस्थता आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार फक्त आज होईल, उद्या होईल सांगून प्रत्येक दिवस ढकलला जात आहे. आमदारही मुख्यमंत्र्यांच्या फोनची वाट पाहत आहेत. मंत्रीपदाची आस लावून असलेल्या या आमदारांची माजी मंत्री बच्चू कडू यांनी खिल्ली उडवली आहे.
बरेचजण फोनची वाट पाहत आहेत. आम्ही त्या दिवशी बसलो होतो. दोन खासदार होते. तुला फोन आला का? असं ते एकमेकांना विचारत होते. एकजण खोटे बोलला, म्हणाला, मला फोन आला. त्यामुळे चार पाच खासदार दिल्लीला पळाले. त्याला फोन आला आणि आम्हाला का नाही आला? असा प्रश्न त्यांना पडला. जशी निकालाची आपण वाट पाहतो. तशीच आमदार फोनची वाट पाहत आहेत. प्रत्येकाला वाटतं मंत्री झालो पाहिजे. भरत गोगावले हे त्यापैकी एक आहे. चांगल्या कॉलची कुणीही वाट पाहतं. फोनची वाट पाहण्यात वाईट काय?, असा सवाल बच्चू कडू यांनी केला. ते मीडियाशी संवाद साधत होते.
मुख्यमंत्री फोन करतात की नाही करत? सर्वजण फोनची वाट पाहत आहेत. बऱ्याच जणांचा यज्ञ सुरू आहे. बायकोही विचारते. काहो फोन येणार आहे का तुम्हाले? मला नाही विचारलं. काही आमदारांना त्यांची बायको विचारत असेल. तुमचं काही जमत नाही का? तुम्ही तर लई कष्ट केले ब्वा. लै मेहनत केली. गुवाहाटीला गेले. तिकडे गेले. बदनाम झाले. फोन आला नाही तर कसं कराल? असं आमदाराची बायको आमदारांना विचारत आहे, अशी कोपरखळीही त्यांनी लगावली.
काँग्रेस फोडण्यापेक्षा येणारे स्वत: तयार आहेत. तलवार घेऊन थोडी येतात लोकं. राजकारणात नवीन पॅटर्न आला आहे. पूर्वी धोतर होतं. आता पँट आली. तसं हा पॅटर्न बदलणार आहे. सुरुवात उद्धव ठाकरे यानी केली. विचाराची अनैसर्गिक युती केली. त्याचा शेवट भाजप करत आहे. या पाच वर्षातील ही राजकारणातील मोठी उलाढाल आहे. ती लोकांना पचनी पडत नाहीये, असं चिमटा त्यांनी काढला.
पक्षाला वाटतं भाजप असो कोणी असो. माझा पक्ष वाढला पाहिजे असं वाटतं. मी सत्तेत आलो पाहिजे. विचाराची सांगड आणि सत्ता दोन तिरावर गेल्या आहेत. पूर्वी एका काठावरून जात होते. सत्तापण सोबत जात होती. आता सत्ता आणि विचारात सांगड बसत नाहीये. त्यामुळे प्रत्येकजण आपलं आपलं पाऊल टाकत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन मुख्यमंत्री होऊ शकतो. आमची तर केंद्रात सत्ता आहे. आम्ही त्याही पेक्षा पॉवरफूल आहे, असं त्यांना वाटतंय. तो ट्रेलर होता आता पिक्चर झाला, असं ते म्हणाले.