‘तुम्हाला लोकं फिरु देतात याचंच धन्यवाद माना, नाहीतर…’, बच्चू कडू यांच्याकडून सर्वपक्षीय आमदारांची कानउघाडणी
बच्चू कडू यांनी आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन सर्वपक्षीय आमदारांची जोरदार कानउघाडणी केली. त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्वपक्षीय आमदारांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी सरकारच्या योजनांवरुनही जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी एक असंसदीय शब्द वापरला. तो शब्द विधानसभेच्या कामकाजांच्या रेकॉर्डवरुन काढण्याचा आदेश तालिका अध्यक्षांनी दिला.
नागपूर | 11 डिसेंबर 2023 : आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन सरकारला घरचा आहेर दिला. यावेळी त्यांनी सरकारच्या योजनांवर सडकून टीका केली. तसेच त्यांनी सर्वपक्षीय आमदारांची चांगलीच कानउघाडणी केली. “सगळे खर्च वाढले, पण आमचे भाव कमी झाले. धन्यवाद माना की, तुम्हाला लोकं फिरु देतात. कारण तुम्ही-आम्ही सर्व पक्षांनी सगळ्या लोकांना जाती-धर्मात गुंतवून ठेवलं. हिरव्या आणि भगव्या रंगात गुंतवून ठेवलं. तुम्ही शेतकऱ्याची फार व्यवस्थित फाळणी केली आहे. त्याच्या डोक्यात शेतकऱ्याचा विचारच येऊ देत नाहीत, इतके हुशार झाले राजकारणी लोकं की, जात एवढी आणि धर्म एवढा टाकला की त्यातून बाहेर येऊ देत नाही”, असं बच्चू कडू भर सभागृहात रोखठोकपणे बोलले.
“आम्ही कोणत्या तोंडाने बोलायचं? आम्ही पक्षाचं आहे म्हणून बोलायचं की शेतकऱ्याचं आहे म्हणून बोलायचं? आमची सरळसरळ हिंमत नाही करत. कारण तिकीट मिळत नाही. कोणत्याही पक्षाचे असूद्या”, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी सर्वपक्षीय आमदारांची कानउघाडणी केली. “पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले, पण शेतमालाला भाव नाही. 400 चं खत 1300 रुपयाला होतं आणि तुम्ही भिकार** योजना आणताय. कोणत्या योजना काय, दोन रुपये किलो गहू द्या, अशी भिकार** योजना द्या म्हणून कोणी सांगितलं? अरे लुटायचं क्विंटलाने आणि द्यायचं किलोने?”, असा सवाल बच्चू कडू यांनी केला.
‘लाज वाटत नाही का?’
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की, मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया. मग आमचा कांदा मेड इन इंडियात बसत नाही का? ही घोषणा कांद्यासाठी का लागू होत नाही? आमच्या भारतातील सर्व गोष्टी बाहेर कशा जातील, असं बोलायचं आणि कांद्याला निर्यातबंदी करायची, का? शहरातील लोकं लट घेऊन बसले आहेत म्हणून? घाबरावतात त्यांना? लाज नाही वाटत का? कांदा महाग झाल्यावर मरत नाही कोणी, काहीही खा, मरतं का?”, असं बच्चू कडू म्हणाले.
“कांद्यावर निर्यातबंदी सरकारला माहीत होतं, निर्यातशुल्क वाढवलंच, त्यापाठोपाठ किती निर्णय सरकारने घेतले, मी सरकारमध्ये आहे, मीही पाठिंबा दिला. पण बापासोबत बेईमान व्हाव की पक्षासोबत व्हावं? शेतकऱ्यासोबत बेईमानी कराल की पक्षासोबत? माझ्या आईने सांगितलं की, पक्षासोबत बेईमानी केली तरी चालेल पण शेतकऱ्यासोबत करु नको”, असं बच्चू कडू म्हणाले.
‘…म्हणून आरक्षणाच्या मागण्या वाढल्या’
“कांद्याने अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार पाडलं. कांद्यावर निर्यातबंदी ही इंदिरा गांधी यांच्यापासून होत आहे. कारण खाणाऱ्याचा विचार होतोय. चांगले शेतमाल भेटला तर आम्हाला आरक्षणाची गरज नाही. पण शेतकऱ्याचं भलं करता आलं नाही म्हणून आरक्षणाच्या मागण्या वाढत चालल्या आहेत”, अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली.