नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने आमदारांना अपात्र केलं तर या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार राहणार नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवटच लागेल. त्याशिवाय पर्याय नाही, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही जयंत पाटील सुरात सूर मिसळला आहे. कोर्टाचा निर्णय आमच्या बाजूने आला तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असा विश्वास बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला आहे. तर कोर्ट या संदर्भात योग्य निर्णय घेईल अशी आमची अपेक्षा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटातील वादावर प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच गृह खात्यावरही निशाणा साधला आहे. या शिवाय संभाजी नगरमधील महाविकास आघाडीच्या सभेची जय्यत तयारी सुरू असल्याचंही म्हटलं आहे. या सभेसाठी लोक प्रचंड उत्सुक आहेत. या सभेला मोठी गर्दी होणार आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. शांतता सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची आणि गृहमंत्र्यांची आहे. त्यांनी ती काळजी घेतली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलंय.
संभाजीनगरमध्ये गालबोट लावण्याचा प्रयत्न तर नाही ना? जिल्ह्यातील वातावरण खराब करण्याची काय आवश्यकता होती? हे हेतू पुरस्कार केला जातो की काय? अशी शंका घ्यायला जागा आहे. मात्र सभा तर होणारच. अत्यंत जोरदार आणि विराट सभा होणार आहे. यानिमित्ताने महाविकास आघाडीची ताकद राज्याला दिसणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आमदारांच्या निधी वाटपातील पक्षपातीपणावरही त्यांनी टीका केली. आम्ही सुरुवातीला स्थगिती सरकार म्हणत होतो. या सरकारमध्ये निधी वाटपात भेदभाव केला जातोय. पूर्वी अशी परिस्थिती नव्हती, असा टोला त्यांनी निधी वाटपावरून लगावला. जेव्हा आपण सत्ता राबवतो तेव्हा निधीचं समान वाटप झालं पाहिजे. एखाद्या मतदारसंघात थोडाफार फरक होतो. मात्र दुर्दैवाने हे सरकार आल्यानंतर प्रचंड फरक केला गेलाय. न विरोधकांना कमी निधी दिला गेलाय, असा आरोप त्यांनी केला.
राजकारणाचा स्तर आता खाली गेलेला आहे. महिलांसंदर्भात कायम आदरानं बोलावं ही एक संस्कृती आहे, आपल्या महाराष्ट्राची. आलं तोंडाला म्हणून काहीही बोलावं, त्याचा काय परिमाण होईल याचा विचार केला पाहिजे. ही आपली संस्कृती नाही याचं भान बाळगलं पाहिजे, अशा शब्दात बेताल विधानं करणाऱ्या नेत्यांचे त्यांनी कान टोचले. तसेच पुण्यातील लोकसभा पोटनिवडणुकी संदर्भात माहिती घेऊन बोलून असं ते म्हणाले.