Nagpur | खबरदार झाडांना खिळे ठोकाल तर… तीन दिवसांत जाहिरात काढण्याची तंबी
तीन दिवसानंतर ज्या जाहिरातदारांच्या जाहिराती झाडांवर दिसतील, त्यांच्यावर मनपाद्वारे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येईल. या संदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
नागपूर : झाडांना खिळे ठोकून त्याद्वारे जाहिराती लावणाऱ्यांविरुद्ध मनपाद्वारे कठोर पवित्रा घेण्यात आला आहे. झाडांना खिळे ठोकून जाहिरात, पोस्टर, भित्तीपत्रे लावणाऱ्यांनी पुढील तीन दिवसांत सर्व जाहिरात काढण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे. तीन दिवसानंतर ज्या जाहिरातदारांच्या जाहिराती झाडांवर दिसतील, त्यांच्यावर मनपाद्वारे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येईल. या संदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
नागपूर महापालिकेतर्फे नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करण्यात आले आहे. मुख्यत्वे रस्त्याच्या कडेला वृक्षलागवड असल्याने जाहिरातदार या झाडांवर खिळे ठोकून जाहिरात लावतात. झाडांना खिळे ठोकल्याने झाडांना इजा पोहोचून नुकसान होते. शिवाय शहराच्या सौंदर्यास बाधा पोहोचून विद्रुपीकरण होते. त्यामुळे शहराचे सौंदर्यीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने जाहिरातदारांनी आपली जबाबदारी ओळखून तीन दिवसात आपल्या जाहिराती काढण्याबाबत आवाहन आयुक्तांनी केले आहे. यानंतर झाडांवर आढळणाऱ्या जाहिरातीसंदर्भात संबंधित जाहिरातदारांविरोधात मनपातर्फे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असेही आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
पाच प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई
नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी पाच प्रतिष्ठानांवर कारवाई करुन 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. पथकाने 46 प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की, लसीचे डोज घेणाऱ्यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
मनपा केंद्रांमध्ये कोव्हीशिल्ड उपलब्ध
राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे 18 वर्षांवरील व 45 वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण होत आहे. लसीकरण नागपूर महापालिकेसह शासकीय केंद्रांवर शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हीशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपातर्फे नागरिकांना मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना प्रथम डोज, दुसरा डोज घेण्यासाठी लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल, ही माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.