गिरीश गायकवाड, Tv9 मराठी, नागपूर | 13 डिसेंबर 2023 : विधी मंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यभरातील सर्व आमदार सध्या नागपुरात आहेत. अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील आमदारांच्या गाठीभेटी देखील होत आहेत. विधान भवन परिसरात आज अशीच एक भट घडून आली. शिवसेना आमदार भरत गोगावले आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची आज योगायोगाने भेट घडून आली. विशेष म्हणजे दोन्ही एकाच वेळी माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर आले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली.
“भरतशेठची मिठी मला अफजल खानाची मिठी वाटते”, असं नितीन देशमुख यावेळी म्हणाले. त्यावर भरत गोगावले यांनीदेखील तसंच उत्तर दिलं. “देशमुख सोबत आले तर मिठी काय, खांद्यावर घेऊन नाचू”, असा मिश्किल टोला भरत गोगावले यांनी लगावला. “मी जास्त जाड आहे की देशमुख जास्त जाड आहे? माझं 72 किलो वजन आहे, देशमुखांचं 80 किलोपेक्षा जास्त वजन आहे. त्यांना जर भीती वाटत असेल, मी शिवाजी महाराजांच्या जिल्ह्यातील, तालुक्यातील आणि तिथल्या भागाचा आहे. आमच्याकडून चुकीचं काही होणार नाही”, असंही गोगावले यावेळी म्हणाले.
भरत गोगावले – नितीन देशमुखनं सुरतला टोकाचा निर्णय घेतला होता. पण मग ते मागे फिरले
भरत गोगावले – मी सुरतचा उल्लेख केला पण त्यात कुठेही छ्त्रपतींचा अपमान केलेला नाही. आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. आम्ही असा कसा अपमान करू? आणि केला तर दहावेळा माफी मागू
नितीन देशमुख – महाराजांनी सुरत लुटली यांना सुरतेनं लुटले
भरत गोगावले – आम्हाला कोणीही लुटले नाही. आम्ही सत्तेत आल्यावर महाराष्ट्राचे भलं केलं, विकास केला.
नितीन देशमुख – काय विकास केला सांगा? मीठी मारणार नाही. कारण ती अफजल खानाची ठरेल
भरत गोगावले – मी काही अफजल खान नाही, त्याच्याच मतदार संघात शिवरायांचा साधा पुतळा नाही
नितीन देशमुख – हे भाजपच्या कमळावर लढतील
भरत गोगावले – काहीही बोलू नका. आम्ही शिवसेनेतूनच लढणार आहोत
भरत गोगावले – नितीन देशमुख माझा मित्र आहे म्हणून त्याला सुरतवरून परत आणण्यास मदत केली. त्याला विचारा, नितीनने शेवटचा टोकाचा निर्णय घेतला होता. पण त्यावेळी मी त्याला मदत केली.
नितीन देशमुख – शेतकऱ्यांना मदत मिळत नाही
भरत गोगावले – अरे मी यात मदत करेन
नितीन देशमुख – असे असेल तर मी मीठी मारतो