राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असते? खोडा कुणी घातला?; शिंदे गटाच्या खासदाराचा सर्वात मोठा दावा काय?
शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधल्याच्या मुद्द्यावर त्यांनी ही टीका केली आहे.
यवतमाळ | 28 ऑगस्ट 2023 : गेल्या वर्षी एक रक्षा बंधन झालं होतं. राखी बांधली आणि ईडी थांबली, असं सांगतानाच हिंमत असेल तर बिल्किस बानोंकडून राखी बांधून घ्या, असं आव्हानच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या हिंगोलीच्या सभेतून केलं होतं. उद्धव ठाकरे यांनी खासदार भावना गवळी यांच्यावर अप्रत्यक्ष टीकाही केली होती. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भावना गवळी यांनी प्रत्युत्तर देताना मोठं विधान केलं आहे. भावना गवळी यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत ही टीका केली आहे.
उद्धव साहेब यांनी वारंवार या पवित्र्य नात्यावर भाष्य केलं आहे. कदाचित त्यांना नात्याचं महत्त्वच माहीत नसेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं कधीच मिटलं असतं. पण त्यावर त्यांनी कधीच निर्णय घेतला नाही, असा गंभीर आरोप भावना गवळी यांनी केला आहे. त्यांनी एक व्हिडीओ व्हायरल करून उद्धव ठाकरे यांच्या कालच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनाच राज ठाकरे यांच्याशी जुळवून घ्यायचं नव्हतं हेच गवळी यांनी अधोरेखित केलं आहे.
नातं टिकवताच आलं नाही
उद्धव ठाकरे यांना कधी नातं टिकवताच आलं नाही. त्यामुळे या नात्यावर आणि पवित्र बंधनावर बोलत असतात. साहेब तुम्ही कधीच कुणाला चांगली वागणूक दिली नाही. आम्ही 13 खासदार का गेलो? याचं चिंतन तुम्ही केलं नाही. 40-50 आमदार शिंदे यांच्यासोबत का जातात? याचंही चिंतन केलेलं नाही. माझ्यासारखी कर्तृत्वान महिला शिवसेनेत पाचवेळा निवडून आली. माझ्या मतदारसंघात मी गेल्या 24 वर्षापासून रक्षा बंधनाचा कार्यक्रम राबवते. मी वाजपेयींना राखी बांधली. मोदींना मी राखी बांधते. त्यामुळे या बंधनावर तुम्ही बोलू नये. तुम्ही कधी बंधन पाळलं नाही. म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असा हल्लाच भावना गवळी यांनी चढवला आहे.
फडणवीसांसोबत गद्दारी
देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना एकत्र लढली. निवडणुकीनंतर फडणवीस यांच्यासोबत गद्दारी केली. एकनाथ शिंदे यांनी खासदार आणि आमदार निवडून आणले. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी आरोग्यासाठी फक्त दोन कोटी रुपये खर्च केले. तर शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आरोग्यासाठी 100 कोटी खर्च केले आहेत, असंही त्या म्हणाल्या.
अर्थ उरणार नाही
उद्धव ठाकरे यांनी गवळी यांच्या मतदारसंघात आपलाच उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याचे शिवसैनिकांना आदेश दिले आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. या जिल्ह्यात खासदार आणि मंत्री म्हणून काम करत असताना शिवसेना वाढली आहे. याचा विसर त्यांना पडू नये. आमच्या पार्टीच्याच नव्हे तर जनतेची आणि विरोधकांची मनेही आम्ही जिंकली आहेत.
तुम्ही काहीही आदेश दिले तरी जनतेचा आदेशच महत्त्वाचा राहणार आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून मोदींकडे बघत आहे. त्यामुळे तुम्ही काहीही आदेश दिले तरी त्याला काही अर्थ उरणार नाही हे मला स्पष्टपणे सांगायचे आहे, असंही त्या म्हणाल्या.