Yavatmal | वणीत नियम धाब्यावर बसवून कोळसा वाहतूक? धूळ व प्रदूषणाची समस्या कायम
वर्षानुवर्षे होत असलेल्या अवैध वाहतुकीवर पोलीस प्रशासन कारवाई का करत नाही? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कठोर कारवाई झाल्याने वणी परिसरात वाढलेलं प्रदूषण कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
यवतमाळ : जिल्ह्यातील वणीत कोळशाच्या नियमबाह्य वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. वणी -यवतमाळ मार्गावर चिखलगाव हद्दीत अनेक कोळसा डेपो आहेत. इथं कोळसा साठवून नंतर त्याची विक्री केली जाते. पण नियम धाब्यावर बसवून कोळसा वाहतूक होत आहे. त्यामुळं या भागात मोठ्या प्रमाणात धूळ आणि प्रदूषणाची समस्या आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय.
प्रशासन कारवाई का करत नाही?
याची दखल घेत वणीचे उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी कोलडेपो धारकांची तातडीने बैठक घेतली. कोळशाचे ओव्हरलोड ट्रक सर्रास चालत आहेत. हे ट्रक झाकलेले नसतात. त्यामुळं उघड्या कोळशाच्या ट्रकमधून धुर किंवा बारीक कण उडून रस्त्यावरील दुचाकीचालकांना त्रास होते. प्रदूषण वाढतं, ही बाब एसडीओ शरद जावळे यांनीही मान्य केली. नियमांचं पालन करण्याच्या सूचना कोलडेपो धारकांना बैठकीत देण्यात आल्यात. पण वर्षानुवर्षे होत असलेल्या अवैध वाहतुकीवर पोलीस प्रशासन कारवाई का करत नाही? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कठोर कारवाई झाल्याने वणी परिसरात वाढलेलं प्रदूषण कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
प्रदूषणाचा भस्मासूर बोकाळलाय
कोलडेपो निर्मिती समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळं नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. लालपुलिया परिसरात प्रदूषणाचा भस्मासूर बोकाळलाय. कोळसा खाणीतून लघुउद्योजकांना कोळसा पुरवठा करण्यासाठी सुमारे शंभर कोळसा व्यवसायिकांनी कोल डेपो थाटले आहेत. शासनाकडं फक्त ६७ कोल डेपो अस्तित्वात असल्याची नोंद आहे.
वाहतूकदार प्रदूषणास जबाबदार
वणी शहरातील लालपुलिया येथील कोल डेपो, रेल्वे सायडिंग, कोळसा वाहतूकदार हे प्रदूषणासाठी जबाबदार आहेत. तसा अहवालदेखील यापूर्वी तयार करण्यात आला आहे. मध्यंतरी कोल डेपो मुख्य रस्त्यापासून पाच किलोमीटर अंतरावर हटविण्याचा आदेश बजावण्यात आला होता. परंतु, त्यानंतर याकडं दुर्लक्ष झालं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवरच एकानं कोल डेपो थाटला. तरीही त्याच्यावर संबंधित विभागातील अधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत.