भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते;” नाना पटोले असं का म्हणालेत?
गिरीश बापट यांची प्रकृती खराब असताना प्रचाराला उतरवले. यावरून सत्तेसाठी भाजप काहीही करू शकते, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
नागपूर : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला असल्याने भाजपने कंबर कसली आहे. कसब्यातून पाच वेळा गिरीश बापट आमदार राहिले आहेत. वय झाल्याने त्यांची प्रकृती बरी राहत नाही. तरीही त्यांना भाजपने प्रचारात उतरविले आहे. यावर आधी राष्ट्रवादीने टीका केली. आजारपणात प्रचारात उतरवून भाजप गिरीश बापट यांच्या जीवाशी खेळत असल्याचं म्हटलं. आता काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनीही यावरून भाजपवर निशाणा साधला. गिरीश बापट यांची प्रकृती खराब असताना प्रचाराला उतरवले. यावरून सत्तेसाठी भाजप काहीही करू शकते, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
नाना पटोले म्हणाले, सत्तासंघर्षाचं प्रकरण न्यायालयात सुरू आहे. निकाल आल्यावर प्रतिक्रिया देता येईल. निकालाची वाट बघतोय. न्याय मिळेल. पण विलंब झाला आहे. संविधानिक सरकार चालत आहे. हे चुकीचे असल्याचंही ते म्हणाले.
अमित शहा दौऱ्याबाबत बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं की, देशातील परिस्थितीवर भूमिका अमित शहा यांनी मांडावी. गृहमंत्री यांनी व्यक्तिगत कार्यक्रमापेक्षा शेती मालाला भाव नाही. शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यावर लक्ष द्यावे.
गुन्हेगारांना घेऊन मंत्री फिरतात
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. तरुणांना फसवण्याचं काम सुरू आहे. तडीपार गुंडाचा वापर भाजप करत आहे. पोलिसांच्या सरंक्षणात गुन्हेगारांना मंत्री घेऊन फिरत आहेत, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.
देशाला उंचीवर नेण्यासाठी माजी पंतप्रधान यांनी महत्वाची भूमिका केली. आजही देशाची परिस्थिती वाईट आहे. याचा अभ्यास असणारे लोक कॉंग्रेसजवळ आहेत. देशाची संविधान व्यवस्था टिकवणारे नेते काँग्रेसजवळ आहेत.
भाजपकडून लोकशाहीचा खून
देशभरात काँग्रेसचे नेते वेगवेगळ्या राज्यात जात आहेत. अदानीबरोबर नरेंद्र मोदी यांचा काय संबंध आहे, हे जनतेसमोर मांडणार आहे. लोकशाहीचा खून भाजप करत आहे. याचा विरोधात जनतेपर्यंत जाऊन वास्तव काँग्रेस मांडणार आहे, असंही नाना पटोले यांनी सांगितलं.
बीबीसी छाप्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, भीती दाखवून राजनीती करण्याचे काम भाजप करत आहे. त्यामुळे भाजप विरोधात बोलले म्हणून बीबीसीवर इन्कम टॅक्सची रेड केली आहे. देशाची जनता माफ करणार नाही.