‘मुलगा-मुलगी यातील जन्मदर घसरत होता म्हणून लाडकी बहीण….’, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा नागपुरात दावा
"या योजनेमुळे घरात महिलांचा सन्मान वाढला. या बहिणी मात्र पैसे दूरुपयोग करत नाही. भाऊ कुठे खर्च करेल याची मात्र गॅरंटी नाही. लाडली बहिण योजनेमुळे अनेक महिलांचे आयुष्य बदलले. आता महिलांना 2100 रुपये देणार आहोत", असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांची प्रचारसभा नागपुरात पार पडली. ही प्रचारसभा जयताळा परिसरात पार पडली. यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून देण्याचं आवाहन जनतेला केलं. त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे जनक असलेल्या शिवराज सिंह यांनी लाडकी बहीण योजनेचे कसे फायदे होत आहे आणि विरोधक त्यावर कशा टीका करत आहे यावर सुद्धा जोरदार भाष्य केलं. तसेच ही योजना सुरु करण्यामागचा उद्देश शिवराज सिंह चौहान यांनी सांगितला. मुलगा-मुलगी यातील जन्मदर घसरत होता म्हणून लाडकी बहीण योजनांसारख्या योजना आपल्या सरकारने आणल्या, असं शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं.
“माझा महाराष्ट्रशी सबंध आहे कारण मी महाराष्ट्राचा जावई आहे, आणि मामा सुद्धा आहे. झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार आहे. देवेंद्र फडणवीस आगळवेगळं व्यक्तीमत्व आहे. त्यांचं संपूर्ण जीवन महाराष्ट्र आणि नागपूरच्या जनतेच्या सेवेत आहे. ते दुसऱ्यासाठी आपलं जीवन जगत आहेत. महाराष्ट्राचा जनतेच्या कल्याणासाठी काम करत आहेत. सत्ता परिवर्तन झाली तेव्हा वाटलं होतं ते मुख्यमंत्री होईल. पण त्यांनी मोठेपणा दाखवत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. नागपुरात 1 लाख कोटींपेक्षा जास्त कोटींचं काम झालं”, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.
शिवराज सिंह लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले?
“लाडकी बहीण योजनेचा विषय पाहता काही लोकांच्या पोटात दुखत आहे. भाजपच्या DNA मध्ये जनतेचा विकास आहे. मध्यप्रदेशात गरीब बहिणीला 1 हजार रुपयांसाठी हात पुढे करावे लागत होते, भावनिक साद घातली. ही लाडकी बहीण निवडणूक योजना नाही, तर मुलगा-मुलगी यातील जन्मदर घसरत होता. यासाठी महिला सशक्तीकरण योजना आणण्यात आल्या. मुलगी जन्माला येताच लखपती असली पाहिजे, यासाठी लाडली लक्ष्मी योजना आणली. आज मध्यप्रदेशमध्ये 50 लाख मुली या योजनेचा लाभ घेत आहेत. गरीब बहिणींसाठी दर महिन्याला पैसे टाकण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसच्या लोकांना विरोध केला. पण आम्ही न्याय दिला”, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.
“या योजनेमुळे घरात महिलांचा सन्मान वाढला. या बहिणी मात्र पैसे दूरुपयोग करत नाही. भाऊ कुठे खर्च करेल याची मात्र गॅरंटी नाही. लाडली बहिण योजनेमुळे अनेक महिलांचे आयुष्य बदलले. आता महिलांना 2100 रुपये देणार आहोत. त्यामुळे आता काही राज्य मजबुरीने देतील”, असं म्हणत शिवराज सिंह यांनी काँग्रेस सरकार असणाऱ्या राज्यातील नेत्यांना टोला लगावला.
“महाविकास आघाडीचे नेते आधी विरोध करत होते, आता मात्र 3 हजर देण्याचा बाता करत आहेत. आता लाडका भाऊ योजना राबवत रोजगार उपलब्ध करून दिला. काँग्रेस काय करत आहे? उद्धव ठाकरे तर कुठलेच राहिले नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांना स्वर्गात त्रास देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. भाजप आरक्षण विरोधी आरोप करणारे बाहेर जाऊन आरक्षण बंद करणार असल्याचे वक्तव्यं करत आहे”, असं म्हणत त्यांनी राहुल गांधी यांनादेखील टोला लगावला.