‘मी मुख्यमंत्री होईल का? असा प्रश्न तुम्हाला का पडत नाही?’; विनोद तावडे नेमकं काय म्हणाले?
भाजप नेते विनोद तावडे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपने नुकतंच देशातील तीन राज्यांच्या निवडणुका जिंकल्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेताना धक्कातंत्र दिला. भाजप तसेच धक्कातंत्र महाराष्ट्रातही 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर देणार का? असा प्रश्न विनोद तावडे यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.
नागपूर | 17 डिसेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात भरपूर मोठ्या घडामोडी घडणार आहेत. येत्या दोन महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर लगेच विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या दोन्ही निवडणुकांआधी शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर मोठी सुनावणी होणार आहे. या दोन्ही प्रकरणांच्या निकालावर महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अंक लिहिला जाण्याची शक्यता आहे. या दरम्यान भाजप नेते आणि महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मुख्यमंत्रीबाबत विचारलेल्या प्रश्नावर मिश्किल उत्तर दिलं आहे. त्यांच्या या मिश्किल उत्तरामागे नेमका काय अर्थ दडलाय? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झालीय. या चर्चांमागील कारण म्हणजे नुकतंच पाच राज्यांमध्ये पार पडलेली विधानसभा निवडणुकीचा निकाल.
देशातील पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकींचा निकाल नुकताच समोर आला. 5 पैकी 3 राज्यांमध्ये भाजपचा विजय झाला. या तीनही राज्यांमध्ये भाजपला विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी कोण असेल? या मुद्द्यावरुन जोरदार चर्चा सुरु होती. भाजपमध्ये या मुद्द्यावरुन अनेक अंतर्गत बैठका झाल्या. मुख्यमंत्रीपदाबाबत अनेक बड्या नेत्यांची नावे चर्चेत होती. पण भाजपने तीनही राज्यांमध्ये धक्कातंत्रचा अवलंब करत ज्या व्यक्तीचं नाव मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चेत नव्हतं त्या व्यक्तीकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली. तसंच धक्कातंत्र भाजप आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अवलंबेल का? भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवलं जाऊ शकतं का? असा प्रश्न पत्रकारांनी विनोद तावडेंना विचारला.
विनोद तावडे नेमकं काय म्हणाले?
विनोद तावडेंनी पत्रकारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या प्रश्नावर मिश्किल प्रतिक्रिया दिली. “हे माझ्याच हातात आहे. पण, मी मुख्यमंत्री होईल का? असा प्रश्न तुम्हाला का पडत नाही? पंकजा मुंडे यांची काळजी पडली का? केव्हातरी माझीही काळजी करा”, असं विनोद तावडे म्हणाले.
‘महाराष्ट्राच्या राजकारणात परत येण्यास इच्छूक नाही’
यावेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. “मी महाराष्ट्रात परत येण्यास इच्छूक नाही, राष्ट्रीय राजकारणात खूश आहे. ओन्ली राष्ट्र”, असं विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं. तसेच “यापुढेही भाजपचा कार्यकर्ता म्हणून पक्ष जे काम देईल ते मी करेन”, असंही विनोद तावडे म्हणाले.
‘…तर अजित पवारांना बरोबर घेतलं नसतं’
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विधानसभेच्या 2019 च्या निवडणुका शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांनी जिंकल्या होत्या.पण उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत गद्दारी केली. त्यामुळे एकनाथ शिंदे बाहेर पडले. शिंदे-फडणवीस सरकार राज्यात असताच अजित पवार आमच्याबरोबर आले. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली नसती तर आज अजित पवारांना बरोबर घेतलं नसतं”, अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिली.
“विनोद तावडे यांनी पुढच्या विधानसभा निवडणुकांबाबतही मोठं वक्तव्य केलं. महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप सामूहिक नेतृत्वात निवडणूक लढवणार आहे. या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णयही सामूहिकरित्या घेण्यात येईल. भाजपने 2014 नंतर राजकारणाची दिशा बदलविली. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे लक्ष्य लोकसभेच्या 400 जागांचे आहे”, अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिली.